आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोनाबाधिताला खांद्यावरून पोहोचवलं अॅम्ब्युलन्सपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गडद अंधारात आरोग्य कर्मचाऱ्यानं पीपीई किट घातल्याचं दिसतं. तसंच खांद्यावर एका कोरोनाबाधित रुग्णालाही घेतलं आहे. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा ससंर्ग अद्याप भारतात कमी झालेला नाही. एक दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना योद्ध्यांच्या प्रेरणादायी अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याशिवाय काही धक्कादायक घटनांमुळे व्यवस्थेतील दोषही समोर आले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णाला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यानं पीपीई किट घातल्याचं दिसतं. तसंच खांद्यावर एका रुग्णालाही घेतलं आहे. आसाममधील हा व्हिडिओ असून आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव गोपाल सैकिया असं आहे. कोरोना बाधिताचे घर जवळच होते. मात्र रस्ता खराब असल्यानं अॅम्ब्युलन्सने आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे गोपाल सैकिया यांनी रुग्णाला खांद्यावर घेऊन अॅम्ब्युलन्सपर्यंत आणलं. इंडिया टूडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गोपाल सैकिया यांनी रुग्णाला अर्धा-एक किमी अंतर चालत खांद्यावरून नेलं. गोपाल सैकिया हे अॅम्ब्युलन्स सेवेसाठी काम करतात. सध्या आसाममध्ये दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 90 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 900 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हे वाचा - 10 फूट लांब अजगराने घातला महिलेला विळखा; व्हिडिओ व्हायरल

भारतात एकूण कोरोना बाधितांची संख्या 78 लाखांच्यावर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे नवे 50 हजार रुग्ण आढळले असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 78 लाख 64 हजार 811 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 70 लाख 78 हजार 123 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. सध्या 6 लाख 68 हजार 154 रुग्ण उपचार घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assam health-worker carry corona positive patient reach ambulance