
महिन्याला फक्त ९ रुपयांची पेन्शन मिळते पण ती घेण्यासाठी आजही नवाबाचे वंशज हजारो रुपये खर्च करून लखनऊमध्ये येतात. अवधचे नवाब मोहम्मद अली शाह यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज दिलं होतं. या कर्जाची रक्कम परत दिली जाणार नव्हती. मात्र त्याचं व्याज आपल्या वंशजांना देण्यात यावं अशी अट नवाबांनी घातली होती. अवधच्या नवाबांना देण्यात येणारी ही पेन्शन म्हणजेच वसीका होय.
नवाबाच्या वंशजांची संख्या जशी वाढेल तशी त्यांना मिळणारी रक्कम कमी होत गेली. पण महिन्याला १० रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळूनही ती घेण्यासाठी वंशज हजारो रुपये खर्च करून येतात. १८७४मध्ये ईस्ट इंडिया कंपनी बंद झाली. त्यानंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारतातून गेले तरीही ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या कर्जाचं व्याज नवाबाच्या वंशजांना आजही दिलं जातंय.