अडवानी, जोशींना राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यातूनही डावलले?

रविराज गायकवाड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भाजपमध्ये पुन्हा ज्येष्ठ नेते अडवानी आणि जोशी यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.मशीद उद्धवस्त केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ नेते अडवानी यांना काही दिवसांपूर्वी बाबरी लखनौमध्ये सीबीआय कोर्टापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहवे लागले होते.

नवी दिल्ली : एकेकाळी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी देशभरात रथयात्रा काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यापासून लांब ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात एनडीटीव्हीने वृत्त प्रसिद्ध केले असून, या सोहळ्याचे निमंत्रण अडवानी यांना देण्यात आले नसल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अडवानींनी फेटाळले आरोप!
एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलंय की, बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमापासून डावलण्यात आलंय. परंतु, केंद्रीय मंत्री, उमा भारती यांना मात्र या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. याप्रकारामुळं भाजपमध्ये पुन्हा ज्येष्ठ नेते अडवानी आणि जोशी यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.मशीद उद्धवस्त केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ नेते अडवानी यांना काही दिवसांपूर्वी बाबरी लखनौमध्ये सीबीआय कोर्टापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहवे लागले होते. त्यावेळी अडवानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती अडवानी यांच्या वकिलांनी दिली होती. अडवानी यांच्या साडे चार तास कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्यांना जवळपास एक हजारहून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. अडवानी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनाही सीबीआय कोर्टापुढे चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान, दोन्ही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोहळ्याला व्हर्चुअली हजेरी लावतील, असं सांगण्यात आलंय. पण, अद्याप दोन्ही नेत्यांना सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आणखी वाचा - अनलॉक 3चे नवीन नियम तुम्ही वाचले का?

उमा भारती, कल्याणसिंह यांना निमंत्रण 
ज्येष्ठ नेते अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती या तीन भाजप नेत्यांवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याचा आरोप होता. त्यापैकी अडवानी आणि जोशी यांना भूमीपूजन सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेलं नाही. पण, सध्याच्या केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे तात्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना भूमीपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

निमंत्रण मिळालच नाही
दरम्यान, कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश भय्याजी जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार यांना दिले आहे, अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली होती. मात्र, अद्याप दोन्ही नेत्यांना सोहळ्याचे निमंत्रण पोहोचलेले नाही. दुसरीकडे उमा भारती आणि कल्याणसिंह यांना सोहळ्याला निमंत्रित करण्याता आल्याचं स्पष्ट झालंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram mandir bhumi pujan advani murli manohar joshi not invited