Ayodhya Ram Mandir : अभिजित मुहूर्तावर अयोध्यापती विराजमान

अयोध्येतील ज्या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते तो राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी दुपारी मोठ्या थाटात पार पडला.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandirsakal

अयोध्या - अयोध्येतील ज्या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते तो राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी दुपारी मोठ्या थाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्रीरामासाठी चांदीचे छत्र घेऊन मंदिरात प्रवेश केला. यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य विधीला सुरुवात झाली.

१२१ पुरोहितांच्या वेदघोषात ठरल्यावेळेप्रमाणे दुपारी १२ वाजून २९ मिनिटे आणि आठ सेकंदांनी, अभिजित मुहूर्त आणि मृगशीर्ष नक्षत्रावर राममंदिरातील गर्भगृहात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

प्राणप्रतिष्ठा विधी सुरू असताना मंदिराबाहेर उपस्थित असलेल्या भाविकांनी रामनामाचा जयघोष केला, या जयघोषाने अवघा मंदिर परिसर राममय झाला. त्याचप्रमाणे आसमंतात निनादणाऱ्या मंगलवाद्यांच्या मंगलध्वनींनी वातावरण अधिक प्रसन्न झाले.

याचवेळी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची आरती झाली. काशीचे पंडित गणेश्‍वरशास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाला.

प्राणप्रतिष्ठा विधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत, या सोहळ्याचे मुख्य यजमान नृपेंद्र मिश्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, पेजावर स्वामी हे गर्भगृहात उपस्थित होते.

रूप मनोहर राघवाचे

प्राणप्रतिष्ठा विधीनंतर सर्व देशवासीयांना प्रभू श्रीरामाच्या सुवर्णालंकांनी सजविलेल्या मनोहर मूर्तीचे दर्शन झाले. श्री रामलल्लाला सोन्याचा रत्नजडित मुकुट घालण्यात आला होता. मस्तकी हिरे माणिकांचा टिळा लावण्यात आला होता. कर्णी सुवर्णाची कुंडले, हातामध्ये हिरेजडित कंकण, गळ्यात माणिक आणि मोत्यांनी मढवलेला कंठा, गळ्यात रत्नजडित हार, कटी पितांबर आणि पायांत चांदीचा वाळा घालण्यात आला होता. रामलल्लाच्या हाती सुवर्णाचे धनुष्यबाण शोभत होते. गतवैभवाची साक्ष देणारे अयोध्येतील रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिर विविधरंगी फुलांनी आणि दीपमाळांनी सजविण्यात आले होते.

राममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा विधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या परिसरात उपस्थित असलेल्या संतमहंत आणि मान्यवरांना अभिवादन केले. यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामचरणांचे तीर्थ प्राशन करून अकरा दिवसांचे अनुष्ठान संपवत उपवास सोडला. यानंतर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी आशीर्वचन दिले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर परिसरातील कुबेर टिला येथे शिवपिंडीलाही जलाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी येथील जटायू मंदिरामध्ये जटायूच्या मूर्तीचे पूजन आणि मूर्तीला पुष्पार्चन केले.

कारागिरांवर पुष्पवृष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानंतर राममंदिर परिसरातील विविध मंदिरांना भेटी देऊन तेथील देवतांचे पूजन केले. यानंतर त्यांनी राममंदिराची निर्मिती करणाऱ्या कारागिरांवर पुष्पवृष्टी केली. पंतप्रधानांच्या या कृतीने मंदिर निर्मिती करणारे कारागीर अत्यंत भारावले होते. पंतप्रधानांनी या आधीदेखील राममंदिर निर्मिती करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला होता. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर भोजनाचा आस्वादही घेतला होता.

रामाबरोबर देशाचे स्वत्व परतले आहे - भागवत

‘रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या आगमनाबरोबरच भारतवर्षाचे ‘स्वत्व’ देखील परत आले आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे बोलताना केले.

मोहन भागवत म्हणाले, ‘आजचा आनंद अवर्णनीय आहे. सर्व जगाला संकटांमधून बाहेर काढण्याचे सामर्थ्य असणारा नवा भारत निर्माण होणार असल्याचे प्रतीक म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, मात्र या उत्साहाच्या वातावरणामध्ये विवेक जागृत ठेवण्याची देखील आवश्‍यकता आहे’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापूर्वी अकरा दिवसांचे अनुष्ठान केले होते त्याचा संदर्भ देत भागवत म्हणाले, ‘मी मोदींना खूप वर्षांपासून ओळखतो, ते तपस्वी आहेत. परंतु केवळ मोदी यांनी एकट्यानेच तप का करावा? आता आपल्याला देशात रामराज्य आणण्यासाठी सगळ्यांनीच देशसेवेचे तप करण्याची आवश्‍यकता आहे.

आपापसांतील मतभेद दूर करणे आवश्‍यक आहे.’ रामराज्यातील नागरिकांचे आचरण ज्याप्रमाणे होते तसे आचरण आपण करणे आवश्‍यक आहे, सत्य, करुणा, शुचिता तप या धर्माच्या चार मूल्यांवर आजच्या काळाला अनुसरून आचरण करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

मंदिरनिर्मितीचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी

राममंदिराच्या इतिहासाबद्दल बोलता भागवत म्हणाले, ज्यांनी या मंदिराच्या आंदोलनासाठी योगदान दिले त्यांना शतशः नमन आहे. जो कोणी राममंदिराच्या निर्मितीचा इतिहास वाचेल, ऐकेल तो देशकार्य करण्यास प्रवृत्त होईल आणि त्याच्या देशाचे दैन्य नाहीसे करण्याची प्रेरणा त्याला या इतिहासातून मिळेल, एवढे या राममंदिर आंदोलनाच्या इतिहासाचे सामर्थ्य आहे.

ही ‘रामराज्या’ची उद्‌घोषणा : योगी

‘ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण पाचशे वर्षांपासून वाट पाहात होतो, तो साकार झाला आहे. हा आपल्या देशाच्या अभिमानाचा क्षण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच ‘रामराज्या’चीही उद्‌घोषणा झाली आहे. त्यामुळे यापुढे अयोध्येत गोळीबाराचे आवाज ऐकून येणार नाहीत की संचारबंदीही लागू होणार नाही. रस्तोरस्ती आता राम संकीर्तन चालेल,’ अशी भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज व्यक्त केली.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या निमंत्रितांसमोर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी हे राममंदिर म्हणजे ‘राष्ट्रमंदिर’ असल्याचे सांगितले. आदित्यनाथ म्हणाले, ‘आपल्या सर्वांसाठी हा भावनिक सोहळा आहे. सर्व देश राममय झाला आहे, जणू आपण त्रेतायुगातच वावरत आहोत.

रामाच्या कृपेने आता अयोध्येच्या रस्त्यांवर गोळीबाराचे आवाज येणार नाहीत की संचारबंदीही लागू होणार नाही. येथील रस्ते ‘दीपोत्सवा’ने उजळून निघतील, सर्वत्र राम संकीर्तन ऐकू येईल. रामलल्ला येथे विराजमान झाल्याने ‘रामराज्या’ची उद्‌घोषणा झाली आहे.’ कोणताही भेदभाव न करता, कोणाचाही द्वेष न करता सर्व समाजात सौहार्दाचे वातावरण असावे, हे रामराज्यात अपेक्षित आहे, असेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

आदित्यनाथ म्हणाले

  • एखाद्या देशातील बहुसंख्याक समुदायाला आपल्याच देशात आपल्याच देवाचे मंदिर बांधण्यासाठी ५०० वर्ष वाट पाहावी लागण्याची जगातील ही एकमेव घटना

  • या मंदिरासाठी प्रत्येक समाज, संत, साधू, नागा, विचारवंत, राजकीय नेते यांनी जातपात विसरून, विचारांतील भेद बाजूला ठेवून काम केले

  • श्रीरामाने आपल्याला सहनशीलता शिकविली

  • अयोध्या हे धार्मिक शहर आता जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल

आखाडे, मठातून रामकथा आणि अनुष्ठान

संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे. अयोध्येत आखाडे आणि मठांची संख्या मोठी आहे. या आखाडे आणि मठातून अनेक दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

जानकी घाट, नया घाट यासह गावात मोठ मोठे आखाडे आहेत. या ठिकाणी काही दिवसांपासून राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपासून अनुष्ठान आणि जपाचे आयोजनही करण्यात आले आहे. मठातून आणि मोठ्या मंदिरात रामलीलाचे आयोजन केले आहे. यातून रामभक्ती प्रकट होत आहे. काही मंदिरात अहोरात्र रामनामाचा जप सुरू आहे. त्यामध्ये स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

विशेष म्हणजे प्रत्येक आखाडा, मंदिरात आणि मठात भाविकांच्या भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. रामचंद्रासाठी आलेला भाविक तृप्त राहावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. शहरातील अनेक भागात भाविकांसाठी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवसभर या ठिकाणी ध्वनीक्षेपकावर प्रभू रामचंद्राची भक्तिगीते लावली जात आहेत. त्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.

सीता की रसोई दिवसभर

करसेवापूरममध्ये असलेल्या ‘सीता की रसोई’मध्ये दररोज बाहेरून आलेल्या भाविकांसाठी सकाळी चहा नाष्टा, दुपारी जेवण आणि रात्री प्रसादाचे वितरण केले जाते. इतर वेळी त्याच्या वेळा ठरलेल्या असतात. गेल्या काही दिवसांपासून मात्र भाविकांना दिवसभर प्रसाद मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभर ही रसोई सुरू असल्याने भाविकांमध्ये समाधान होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही या रसोईचा लाभ होत आहे.

हूरहूर...नि:शब्दता...अन् अश्रू...

सुमारे पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आलेले यश...समोर प्रत्यक्ष राममंदिर दिसत आहे...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेले रामलल्लाच्या मूर्तीचे झालेले विमोचन पाहताक्षणी उपस्थित लाखो भाविकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. काही काळ तर सर्वत्र नि:शब्दतेचे वातावरण झाले होते. विमोचन होताच जय सियारामाच्या जयजयकाराने मंदिर परिसरासह अयोध्यानगरी दुमदूमून गेली.

प्रत्यक्ष राममंदिर साकार झालेले आपल्याला पाहायला मिळणार की नाही, अशी भावना असलेल्या लाखो लोकांना रामचंद्रांचे राजीव नयन दर्शन होताच अश्रू अनावर झाले. अयोध्येत आज सकाळपासून सर्व रस्ते हनुमान गढी जाण्यासाठी फुलले होते. देशभरातून आलेले लाखो भाविक मंदिराची आणि रामचंद्रांची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अयोध्येतील प्रत्येक चौक फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य नागरिकांना कार्यक्रमस्थळी जाण्यास परवानगी नव्हती. परंतु चौकाचौकात आणि प्रत्येक घाटावर मोठे स्क्रिन लावण्यात आले होते. देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी त्यावर रामचंद्रांचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर परिसरात प्रवेश होताच जय सियारामच्या चौकाचौकात घोषणा झाल्या.

पंतप्रधान मोदी एक-एक गर्भगृह पार करत मंदिरात प्रवेश करत होते, तसतशी सामान्य लोकांची उत्सुकता आणखी वाढत होती. अक्षरश: प्राण कंठाशी आणून प्रत्येक विधी पाहत होते. प्रत्यक्ष मूर्तीचे विमोचन होत असताना दोन मिनिटे सर्वत्र कमालीची शांतता पसरली होती. मनात असलेली हूरहूर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आणि प्रत्यक्ष राजीव नयन प्रभू रामचंद्रांचे दर्शन होताच लाखो भाविकांच्या डोळ्यांनी अश्रूंन वाट मोकळी करून दिली.

मनःपूर्वक दर्शन घेतल्यावर मात्र जय सियारामच्या घोषणांनी अयोध्यानगरीसह सर्व घाट दुमदुमून गेले होते. हनुमान गुँफा चौकापासून ते हनुमान गढी रस्त्यावर दुतर्फा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा रस्ता लता मंगेशकर चौकानंतर हनुमान गढीपर्यंत सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकार संस्कृती विभागाच्या वतीने सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

क्षणचित्रे

  • चौकाचौकांत फुलांची आकर्षक सजावट

  • मोठ्या स्क्रिनची सर्वत्र व्यवस्था

  • सर्वत्र कडक बंदोबस्त

  • शहरातील सर्व मठांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम

  • लाखो भक्तांसाठी विविध संस्था, मठाच्यावतीने भोजनाची व्यवस्था

केंद्रीय मंत्र्यांकडून दिल्लीतील मंदिरांमध्ये पूजा

नवी दिल्ली - अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीतील विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आज दिल्लीतील विविध ठिकाणी मिरवणूक, पूजा व भंडारा आयोजित केला होता.

राजधानी दिल्लीत आज राममय वातावरण पाहायला मिळाले. प्रत्येक मंदिरावर रोषणाई व सजावट करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीतील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण बिर्ला मंदिरात जाऊन पूजा केली.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी झंडेवालान येथील मंदिरात पूजा केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हौजखास येथील जगन्नाथ मंदिरात पूजा केली. तसेच, भाजपच्या नेत्यांनी मंदिरातच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले.

भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीतील जी. बी. रोडवर गरजूंना ब्लॅँकेटचे वितरण केली. खासदार रमेश बिधुडी यांनी तुघलकाबाद येथे स्वच्छता मोहीम राबविली व मंदिरात पूजा केली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी दिल्लीत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दोन हजार ठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था केल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com