बालाकोटमध्ये 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा खोटा; वाचा खरं काय?

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

एअरस्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याचं वक्तव्य पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट इथं भारतीय लष्कराने एअर स्ट्राइक केला होता. एअरस्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याचं वक्तव्य पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं. फॅक्ट चेक वेबसाइट आल्ट न्यूजने ही बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. ज्या व्हिडिओ क्लिपच्या आधारावर बातमी करण्यात आली होती तो व्हिडिओ एडीट करण्यात आला होता. 

एएनआयच्या हवाल्याने अनेक माध्यमांमधून ही बातमी प्रसारीत झाली होती. यात दावा करण्यात आला होता की, माजी पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका पाकिस्तानी चॅनेलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यात आगा हिलाली यांनी म्हटलं होतं की, 26 फेब्रुवारी 2019 ला भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, टीव्ही डिबेटमध्ये पाकिस्तानी सैन्याची बाजू घेणाऱ्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचं हे वक्तव्य एकदम विरोधाभासी होतं. प्रत्यक्षात एअर स्ट्राइकमध्ये कोणाचाच मृत्यू झाला नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं. 

हे वाचा - कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं

एएआयच्या रिपोर्टमध्ये आगा हिलाली यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे युद्धजन्य कारवाया केल्या. ज्यात 300 लोकांचा मृत्यू झाला. आमचं लक्ष्य त्यांच्यापेक्षा वेगळं होतं. आम्ही त्यांच्या हायकमांडला टार्गेट केलं. आमचं खरं लक्ष्य ते होते कारण ते सेनेचे लोक होते. सर्जिकल स्ट्राइकमुळे काही नुकसान झालेलं नव्हतं. आता आम्ही फक्त त्यांच्या कारवाईला उत्तर देऊ त्यापेक्षा काही करणार नाही. 

आल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये मात्र हा रिपोर्ट चुकीचा असल्याचं समोर आलं आहे. ज्या राजनैतिक अधिकाऱ्याने वक्तव्य केलं होतं त्यांच नाव जफर हिलाली असं आहे. HUM न्यूजचा प्रोग्रॅम 'अजेंडा पाकिस्तान'चा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता. यात हिलाली यांनी म्हटलं होतं की, भारताने जे केलं तो युद्धाचा प्रकार होता. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केलेली युद्धजन्य कारवाई होती ती. यामध्ये कमीत कमी 300 लोकांना ठार करायचं होतं. पण असं झालं नाही. भारताने जे बॉम्ब फेकले ते एका फुटबॉल मैदानात पडल्याचा दावा त्यात केला आहे.

हे वाचा - भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार - पंतप्रधान मोदी

वृत्त प्रसारीत झाल्यानंतर हिलाली यांनी एक व्हिडिओ ट्विट करून सांगितलं की, त्यांचा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये  0.7 ते 0.9 सेंकदावेळी अचाकन कट दिसतो आणि हिलाली यांच्या मारना शब्दाला मारा असं ए़डिट केल्याचं आल्ट न्यूजने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balakot airstrike 300 casualties pak officer video fake alt news