जीडीपीच्या शर्यतीत बांग्लादेशही टाकणार भारताला मागे; IMFचा धक्कादायक रिपोर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी International Monetary Fund (IMF) च्या रिपोर्टनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) बांगलादेश भारताला मागे टाकत पुढे जाण्यास तयार आहे.

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी International Monetary Fund (IMF) च्या रिपोर्टनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) बांगलादेश भारताला मागे टाकत पुढे जाण्यास तयार आहे. आयएमएफच्या (IMF) वर्ल्ड इकोनॉमिक आउटलूकनुसार (WEO), 2020 मध्ये बांगलादेशची दरडोई जीडीपी 4 टक्क्यांनी वाढून 1,888 डॉलर होण्याची शक्यता आहे, तर भारताची दरडोई जीडीपी घटून 1,877 डॉलर होण्याची शक्यता आहे, जी गेल्या चार वर्षातील सर्वात कमी आहे. आयएमएफने अंदाज लावलाय की यावर्षी भारताच्या जीडीपीमध्ये 10.3 टक्क्यांनी घट होऊ शकते. 

आयएमएफने भारतासंबंधी केलेला हा अंदाज, जून महिन्यात केलेल्या अनुमानापेक्षा खूप कमी आहे. कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे आकुंचन पाहायला मिळत आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेला रिपोर्टनुसार, दोन्ही देशांच्या जीडीपीचा आकडा सध्याच्या किंमतींवर आधारित आहे. आयएमएफने जून महिन्यात उत्पादन 4.5 टक्के कमी होण्याचा अंदाज लावला होता.  

'सुपरमॉम'; परीक्षा सुरु असतानाच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

आयएमएफच्या डब्लुईओच्या रिपोर्टनुसार, भारत दक्षिण आशियामध्ये तिसरा सर्वाधिक गरीब देश बनण्याच्या वाटेवर आहे. केवळ पाकिस्तान आणि नेपाळची दरडोई जीडीपी भारतापेक्षा कमी असेल. दुसरीकडे बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि मालदीव सारखे देश भारतापेक्षा पुढे असणार आहेत. 

आयएमएफने असाही अंदाज लावला आहे की, 2021 मध्ये 8.8 टक्क्यांच्या विकास दरासोबत भारत आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभारी घेऊ शकते. भारत येत्या काळात आपला विकासदर पुन्हा गाठून चीनच्या 8.2 टक्के विकासदराला मागे टाकू शकतो.

आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळणार आहे. 2021 मध्ये जागतिक  जीडीपी 5.2 टक्क्यांनी वाढेल. रिपोर्टनुसार 2020 मध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत 5.8 टक्यांची कमी येण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षी यात 3.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. 2020 मध्ये चीन एकमेव देश असेल, ज्याची अर्थव्यवस्था 1.9 टक्क्यांनी वाढेल.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangladesh will surpass india in gdp said International Monetary Fund