
कुटुंबीयांनी मुलीला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं; पण..
Bareilly : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; 8 महिन्यांच्या चिमुरडीचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशातील बरेली (Uttar Pradesh Bareilly) इथं एक भीषण दुर्घटना घडलीय. फरीदपूरच्या पचौमी गावात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा (Mobile) स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत आठ महिन्यांची चिमुरडी गंभीररित्या भाजली. कुटुंबीयांनी मुलीला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या मुलीचं नाव नेहा असं आहे. नेहाचे वडील सुनील हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. काही काळापूर्वी त्यांनी लावा कंपनीचा एक मोबाईल खरेदी केला होता. पण, त्यांच्या घरात विजेची समस्या असल्याने त्यांचा फोन चार्ज होत नव्हता. त्यामुळं त्यांनी सोलार पॅनल आणून त्यानं फोन चार्ज करायला सुरुवात केली. घटनेच्या दिवशी सोलार पॅनेलवरूनच फोन चार्जिंग सुरू होतं. त्या दरम्यान फोन जास्त चार्ज झाला आणि गरम होऊन फुटला.
त्या स्फोटात सुनील यांची 8 महिन्यांची मुलगी होरपळली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. नेहाचे हात आणि पाठ प्रचंड भाजली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगी जवळपास 30 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बदायूंमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी लाईटबोर्डवर चार्जर लावणाऱ्या महिलेचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी कोणतीही कारवाई न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.