

Belagavi SIR Voter List
esakal
बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्याचा डाव रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते अमान सेठ यांनी केला आहे. मतदार यादी पुनरिक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेतील सरकारी कर्मचाऱ्यांवरही राजकीय दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. वीरभद्रनगर येथे मंगळवारी (ता. २२) घडलेल्या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आलेल्या तसेच विविध कारणांमुळे यादीतून वगळण्याच्या प्रक्रियेत असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २२) वीरभद्रनगर येथे काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करत अमान सेठ यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला.
दरम्यान, एसआयआरची कार्यवाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही राजकीय दबाव आणण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदारसंघातील विविध भागांत अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचे अमान सेठ यांनी सांगितले.
भाजपकडून संशयित मतदारांच्या नावांवर आक्षेप घेऊन नियमानुसार अर्ज सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पात्र असलेल्या एकाही मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळले जाऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अमान सेठ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतरच निर्माण झालेला गोंधळ दूर होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमधील आठ हजार संशयित मतदारांबाबत भाजपकडून आक्षेप नोंदविले आहेत. यासाठी सात क्रमांकाचा अर्ज भरला आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन पडताळणी केली जात आहे. यावरून मतदार यादीतील नावे ‘डिलीट’ होण्याची भीती निर्माण झाली आहे.
"मतदार यादीमधून नावे वगळण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून मतदार यादी मधील गैरकारभार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले आहेत."
- अमान सेठ, काँग्रेस नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.