

Mirkarwada Jetty Cleanup
esakal
रत्नागिरी : मिरकरवाडा येथील जेटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पडून राहिलेल्या जुन्या, विनावापर आणि मोडक्या नौकांच्या अवशेषांवर आज मत्स्यविभागाने धडक कारवाई केली. या अवशेषांमुळे बंदरात नौकांची ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. या गंभीर समस्येकडे मच्छीमारांनी लक्ष वेधल्यानंतर प्राधिकरणाच्या माध्यमातून ३० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी १५ जणांनी स्वतःहून केबिन हटवली. उर्वरित १५ केबिन आज जेसीबीच्या माध्यमातून हटवल्याने बंदरावरील जेटींनी मोकळा श्वास घेतला.
सहायक मत्स्यआयुक्त विभागाने आज सकाळपासून ही कारवाई सुरू केली. मिरकरवाडा बंदर हे कोकणातील एक महत्त्वाचे आणि गजबजलेले मच्छीमार केंद्र आहे; मात्र गेल्या काही काळापासून बंदराच्या तीन जेटी परिसरात मोडून पडलेल्या, निकामी झालेल्या आणि वापरण्यायोग्य नसलेल्या नौकांचे अवशेष तसेच सुट्टे भाग अनधिकृतपणे ठेवण्यात आले होते. यामुळे पाण्याच्या प्रवाहात आणि जेटीजवळ नौका लावण्यासाठी जागा उरली नव्हती. परिणामी, अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. नियमित मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या त्रासाबाबत मच्छीमारांनी मत्स्यविभागाकडे प्रशासकीय पातळीवर तक्रारी नोंदवल्या होत्या. याची दखल घेत प्राधिकरणाने तत्काळ पावले उचलत सुमारे ३० नौकामालकांना नोटिसा जारी केल्या. प्राधिकरणाच्या या कडक इशाऱ्यानंतर काही नौकामालकांनी स्वतःहून आपले खराब झालेले भाग आणि अवशेष बंदरातून हटवण्यास सुरुवात केली आहे. चार नोटिसा देऊन देखील काही नौकामालकांच्या नौकांचे अवशेष तसेच पडून होते. ते आज मत्स्यविभागाने जेसीबीच्या मदतीने काढून टाकले. यामुळे जेटीचा परिसरा मोकळा झाला आहे.
"विनावापर नौकांचे केबिन, बिंगी ठेवलल्या मालकांना चारवेळा नोटीस बजावल्या होत्या. यामुळे जेटींवर अनधिकृत, नादुरुस्त केबिन आणि कचऱ्याचे साम्राज्य झाले होते. लोकांना हायजिनिक मासा खायला मिळावा, जेटी स्वच्छ राहावी यासाठी आज ही कारवाई करण्यात आली. १५ जणांनी स्वतःहून केबिन हटवली. उर्वरित आज आम्ही हटवली."
-जीवन सावंत, सहायक मत्स्य आयुक्त, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.