भाजप कार्यकर्त्यांना अटक करणाऱ्या पोलिस आयुक्ताचा तडकाफडकी राजीनामा

वृत्तसंस्था
Friday, 29 January 2021

२१ जानेवारीला बंगालमध्ये भाजपने एक रॅली आयोजित केली होती. यावेळी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी 'गोली मारो' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिस आयुक्त कबीर यांनी त्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती.

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय निदर्शनांदरम्यान 'गोली मारो' अशी घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करणाऱ्या पोलिस आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हुमायूँ कबीर असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण दिले आहे. कोलकत्ताजवळील चंदननगरमध्ये हुमायूँ पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. आणि डिसेंबरमध्येच त्यांना बढती देण्यात आली होती. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय वादंगाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आला आहे.

दिल्ली सीमेवर स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज​

दरम्यान, २१ जानेवारीला बंगालमध्ये भाजपने एक रॅली आयोजित केली होती. यावेळी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी 'गोली मारो' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिस आयुक्त कबीर यांनी त्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. हिंसाचाराला खतपाणी देणाऱ्या जमावाला भडकवण्यासाठी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली होती. स्थानिक भाजप नेते सुरेश शॉ आणि अन्य दोघांनी घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी काही वेळातच त्यांना ताब्यात घेतलं होतं. या रॅलीचे नेतृत्व भाजप नेते सुवेंदू अधिकारी आणि हुगळीचे भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी हे करत होते. 

फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!​

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या लोकांपैकी सुवेंदू अधिकारी हे एक होते. पण गेल्या महिन्यातच त्यांनी तृणमूलला रामराम ठोकला. त्यानंतर तृणमूल सोडणाऱ्यांची रांगच लागली होती.

''हिंसाचार घडवण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे, या प्रकरणी तृणमूलचा काहीही संबंध नाही,'' असं स्पष्टीकरण तृणमूलचे खासदार सौगाता रॉय यांनी दिलं आहे. 

Budget 2021: बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार? पाहा व्हिडिओ

पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एक दिवस आधीच तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबतची माहिती तृणमूलने निवडणूक आयोगाला दिली होती. पण या प्रकरणी पक्षपात केल्याची तक्रार भाजपने केली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengal IPS Officer Humayun Kabir resigns who arrested BJP workers on shoot slogan