भारत बायोटेक लशीच्या ट्रायलचा तिसरा टप्पा सुरु; पुढच्या वर्षी येणार लस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की देशभरात फेज 3 ट्रायलला यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचेच सध्या ध्येय आहे.

नवी दिल्ली :  गेल्या आठ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग या विषाणूने त्रस्त झाले असून आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच, जगभरात या विषाणूविरोधात परिणामकारक ठरणारी लस ठिकठिकाणी शोधली जाता आहे. भारतात प्रामुख्याने तीन लशींची ट्रायल युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटची लस, भारत बायोटेक कंपनीची लस आणि रशियाच्या स्फुटनिक-व्ही या लशीचा समावेश आहे. यातील भारत बायोटेकच्या लशीसंदर्भात सध्या सकारात्मक घडामोडी घडत आहेत. 

भारत बायोटेकच्या कोरोना लशीला जर भारतीय नियामकांनी मंजूरी दिली तर कंपनी या लशीला पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच करु शकते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहीती देताना सांगितलं की आज देशभरात फेज 3 ट्रायलला यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचेच ध्येय आहे. कंपनीने कोव्हॅक्सीन या लशीला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने बनवलं आहे. यामध्ये निष्क्रीय SARS-COV-2 व्हायरसचा वापर केला गेला आहे. व्हायरसला आयसीएमआरच्या लॅबमध्ये वेगळं केलं गेलं होतं.  

हेही वाचा - गॅस सिलिंडर, बँकिंग सेवेत आजपासून मोठे बदल; ग्राहकांच्या खिशाला कात्री

भारत बायोटेकच्या इंटरनॅशनल एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर साई प्रसाद यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, फेज 3 च्या चाचणीतील मजबूत डाटा आणि पुराव्यांशिवाय प्रभाव आणि सुरक्षा डाटाच्या नंतर आम्हाला जर मंजूरी मिळाली तर आमचे लक्ष लशीला 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच करण्याचे आहे. लशीच्या परिणामकारकतेला तपासण्यासाठी तीन क्लिनीकल ट्रायलसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मंजूरी मिळाल्यानंतर कंपीनने फेज 3 ची परिक्षणाची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी रिक्रूटमेंट आणि डोस देण्याचे काम नोव्हेंबरमध्ये सुरु होईल. प्रसाद यांनी म्हटलं की, 13-14 राज्यांमध्ये 25 ते 30 ठिकाणी ट्रायल होईल, ज्यामध्ये व्हॉलेंटीअर्सना डोस दिले जातील. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जवळपास 2 हजार लोकांना लस दिली जाऊ शकते. लशीच्या गुंतवणुकीसंदर्भात प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, लशीची निर्मिती आणि तिच्या उत्पादनासाठी आम्ही जवळपास 350-400 कोटी रुपये गुंतवले आहेत. यामध्ये पुढच्या सहा महिन्यांपर्यंत फेज 3 च्या ट्रायलची गुंतवणूक देखील समाविष्ट आहे. 

हेही वाचा - शनिवारी 46,964 नवे रुग्ण; तर 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू

लस सरकारद्वारे विकली जाईल की खासगी पद्धतीने या प्रश्नावर प्रसाद यांनी म्हटलं की, आम्ही सरकार आणि खासगी अशा दोन्ही पद्धतीने लशीचा वितरणाचा विचार करत आहोत. आम्ही दुसऱ्या देशांमध्ये पुरवठा करण्यासंदर्भातदेखील बातचीत करत आहोत. प्रसाद यांनी म्हटलं की, या लशीची किंमत अद्याप निर्धारित करण्यात आली नाहीये. कारण, लशीच्या निर्मितीची किंमत अद्याप तपासली जात आहे. त्यांनी म्हटलं की सध्या कंपनीचे लक्ष्य फक्त लशीच्या फेज 3 ट्रायलवर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat biotech covaxin third phase trail starts next year launch