लसीचे दुष्परिणाम झाले तर नुकसान भरपाई देणार - भारत बायोटेक

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

देशात काही ठिकाणी स्वदेशी लस कोव्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत आता भारत बायोटेकने मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात देशव्यापी लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, देशात काही ठिकाणी स्वदेशी लस कोव्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत आता भारत बायोटेकने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं की, जर डोस घेतल्यानं कोणावर गंभीर दुष्परिणाम झाले तर कंपनीतर्फे नुकसान भरपाई देण्यात येईल. भारत बायोटेकच्या 55 लाख डोसची खरेदी केंद्र सरकारने केली आहे.

लस घेणाऱ्यांनी भरलेल्या एका अर्जावर असं लिहिण्यात आलं आहे की, कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम झाल्यास सरकारकडून ठरवण्यात आलेल्या अधिकृत केंद्र आणि रुग्णालयामध्ये उपचार केले जातील. जर लसीमुळे दुष्परिणाम झाले तर याची नुकसान भरपाई कंपनी करेल. 

हे वाचा - कोविशील्डच द्या; स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांनीच दिला नकार

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये कोरोना विरोधात अँडिबॉडीज तयार झाल्या होत्या. अद्याप कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल येणे बाकी आहेत. लसीचा प्रभाव तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या डेटावर आधारीत असेल. 

अर्जात असं सांगण्यात आलं आहे की, लस घेतली म्हणजे असं नाही की यानंतर कोरोनासाठी असलेले प्रोटोकॉल पाळणं बंद करायचं. लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट देण्यात येईल. याशिवाय एका फॉर्ममध्ये दुष्परिणाम आल्यास त्याची माहिती लिहून तो सात दिवसांच्या आत द्यावा लागणार आहे.

हे वाचा - पुण्यात बर्ड फ्लू ते देशात कोरोना लसीकरण; वाचा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. दिल्लीतील 81 केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये 75 केंद्रांवर ऑक्सफर्डची कोविशील्ड लस तर इतर सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat-biotech-to-pay-compensation-if side-effects because covaxin