भाऊराया सातव्यांदा मुख्यमंत्री पण बहीण म्हणते नितीशने आता पंतप्रधान बनावं 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

 पण आता त्यांनी पुढे जावं... पंतप्रधान बनावं, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, अशी अपेक्षा त्यांच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केली आहे. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करुन एनडीएने पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आहे. 243 जागांपैकी 125 जागांवर जिंकून निर्विवादपणे त्यांनी बहुमत प्राप्त केलं आहे. केवळ 43 जागा प्राप्त होऊनही नितीश कुमार यांनी काल सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल भाऊबीजनिमित्त न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मोठ्या बहिणीने नितीश कुमार यांनी पंतप्रधान बनलं पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचा - स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी
भाऊबीजनिमित्त आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्यांनी एका पुजेचं आयोजनही केलं होतं. या प्रसंगी त्यांनी मुलाखत दिली. आज आपल्याला काय अपेक्षित आहे आणि आपण नितीश यांना काय आशीर्वाद द्याल, असं विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या की, त्यांनी आता पंतप्रधान बनायला हवं. ते आता सातव्यांदा मुख्यमंत्री बनताहेत, असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या की हो, ते सातव्यांदा मुख्यमंत्री बनताहेत.  पण आता त्यांनी पुढे जावं... पंतप्रधान बनावं, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, अशी अपेक्षा त्यांच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केली आहे. 

उषा देवी असं या त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव आहे. नितीश कुमार यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे. काल भाऊबीजेदिवशीच नितीश कुमार यांचा शपथविधी समारोह झाला. यावेळी भाऊबीजेनिमित्त आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत उषा देवी यांनी पुजेचं आयोजन केलं होतं. आपण पुजेचा प्रसाद घेऊन आपल्या भावाला भेटायला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला की मी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा - 7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; नितीश कुमार यांचा सातव्यांदा शपथविधी
काल पाटणामध्ये दुपारी साडेचार वाजता नितीश कुमार यांचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस असे प्रमुख नेते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar cm nitish kumar sister usha devi says nitish should become prime minister now