esakal | Bihar Election: मोदींना नेते मानणाऱ्या पासवानांकडून भाजपलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

chirag paswan bjp.jpg

चिराग पासवान यांच्या या भूमिकेमुळे निवडणुकीत जेडीयूला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत भाजपच्या मोठ्या नेत्यांनी पासवान यांच्या उपस्थितीत लोजपामध्ये प्रवेश केला आहे.

Bihar Election: मोदींना नेते मानणाऱ्या पासवानांकडून भाजपलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पाटणा- मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्यास नकार देत चिराग पासवान यांनी लोजपा एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. लोजपा एनडीएतून बाहेर पडली असली तरी आमचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असून निवडणुकीनंतर आम्ही त्यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगून पासवान यांनी बिहारच्या राजकीय वर्तुळात संभ्रम वाढवला. इतक्यावरच न थांबता आता त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांनाच फोडून त्यांना लोजपामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. चिराग पासवान यांच्या या भूमिकेमुळे निवडणुकीत जेडीयूला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत भाजपच्या मोठ्या नेत्यांनी पासवान यांच्या उपस्थितीत लोजपामध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लोजपात प्रवेश केला आहे. त्यातील बहुतांश जेडीयूच्या खात्यात असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

भाजपच्या धडाडीच्या महिला नेत्या आणि पालीगंजच्या माजी आमदार डॉ. उषा विद्यार्थी यांनी लोजपात प्रवेश केला. गतवेळी महाआघाडीविरोधात लढताना पालीगंजमधून उषा विद्यार्थी यांच्याऐवजी भाजपने रामजनम शर्मा यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी विद्यार्थी या बंडखोरीच्या पावित्र्यात होत्या. परंतु, नंतर त्यांना बिहार राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी नेमण्यात आले. यावेळी त्यांना पालीगंजमधून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी ही जागा जेडीयूच्या खात्यात गेली. या जागेवर जेडीयूचे विद्यमान आमदार जयवर्धन यादव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यादव यांनी नुकताच आरजेडीचा त्याग करुन जेडीयूत प्रवेश केला आहे. 

हेही वाचा- 'सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करणे चुकीचे'; शाहीन बाग प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाचा निकाल

पालीगंज मतदारसंघात विद्यार्थी यांची चांगली पकड आहे. या जागेवर विद्यार्थी या उमेदवार असल्याचा याचा फटका जेडीयूला अर्थात एनडीएलाच बसणार आहे. 

भाजपचे दिग्गज नेते राजेंद्र सिंहही लोजपात

दिनारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज राजेंद्रसिंह यांनी मंगळवारी लोजपात प्रवेश केला. दिनारातून जेडीयूचे मंत्री जयकुमार सिंह निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र सिंह यांच्याबरोबर भाजपमधील अनेक नेते बंडखोरीच्या मानसिकतेत आहेत. 

हेही वाचा- Bihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश

जेडीयूच्या नेत्यांचाही भाजपत प्रवेश 

दरम्यान, माजी मंत्री भगवानसिंह कुशवाहा यांनीही जेडीयूला धक्का देत लोजपामध्ये प्रवेश केला आहे. कुशवाहा यांना जगदीशपूर येथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. ही जागा जेडीयूकडेच आहे. परंतु, कुशवाहा यांची उमेदवारीच कापण्यात आली आहे. आपल्याला धोका दिला असून आता जेडीयूत थांबण्यात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच मतदारसंघात कुशवाहा उभारले तर जेडीयूच्या मतांमध्ये विभागणी होणार असून यामुळे एनडीएचेच नुकसान होणार आहे.