Bihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

नरेंद्र मोदी हे आरा जिल्ह्यातील शाहाबाद येथून 23 अथवा 24 ऑक्टोबर रोजी आपल्या रॅलीस सुरवात करतील असा अंदाज आहे.

पाटणा : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आखाड्यातील सगळे पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने लढणाऱ्या जेडीयू-भाजपा युतीला राजद-काँग्रेस आघाडीने आव्हान दिलं आहे. काँग्रेसने याआधीच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आता भाजपानेही आपले स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या प्रचार रॅलीची योजना बनवली आहे. एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदी हे आरा जिल्ह्यातील शाहाबाद येथून 23 अथवा 24 ऑक्टोबर रोजी आपल्या रॅलीस सुरवात करतील असा अंदाज आहे. याआधी ते 22 ऑक्टोबर रोजी प्रचारसभा घेतील, असं बोललं जात होतं. 

हेही वाचा - 'ठणठणीत' लोकांनो हात धुवत रहा; 2022 पर्यंत तरी तुम्हाला लस नाही

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत 12 प्रचारसभांमध्ये मतदारांना संबोधित करणार आहेत. इतकेच नव्हे तर आणखी चार प्रचारसभा मोदींच्या व्हाव्यात अशी मागणी बिहार भाजपाकडून केली जात आहे. मात्र, अद्याप या मागणीबाबतचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून झालेला नाहीये. 

कोरोनानंतर पहिल्यांदाच अमित शहा मैदानात 

पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील काही प्रचारसभांचे नेतृत्व करणार आहेत. राज्यात त्यांच्या 20 ते 25 सभा होणार असल्याची माहिती आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 15  ते 20 प्रचार रॅली तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील 15 ते 20 रॅलीमध्ये प्रचार करणार असल्याची माहिती आहे. तसेच अनेक मोठे नेते लहान स्वरुपातील रस्त्यावरील कॉर्नर मीटिंगदेखील घेणार आहेत. 

हेही वाचा - Bihar Election : 'ही तर माझ्याच गाण्याची नक्कल'; भाजपाच्या प्रचारगीतावर अनुभव सिन्हांचा आक्षेप

बिहारच्या निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहेत. यातील  पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान  होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी मतदान होणार असून 3 नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा 
निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election modi will take 12 election rally amit shaha on field defeating corona