Bihar Election: ... तर तेजस्वी ठरतील सर्वात युवा मुख्यमंत्री, करतील 3 विक्रम नावावर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

तेजस्वी यादव यांना बहुमत मिळाले तर भारतीय राजकारणात पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांचे आई-वडीलही मुख्यमंत्रिपदी होते. ते एकाच कुटुंबात तीन मुख्यमंत्री होण्याचा अब्दुल्ला कुटुंबाच्या विक्रमाची बरोबरी करतील.

नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीच्या बहुतांश सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला  आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. नंतर मात्र नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने पुन्हा मुसंडी मारली असून त्यांनी महाआघाडीला मागे टाकले आहे. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरल्यास तेजस्वी यादव तीन नवीन विक्रम आपल्या नावावर करतील. ते देशातील सर्वात युवा मुख्यमंत्री ठरतील. त्याचबरोबर बिहारमध्ये एकाच कुटुंबातील मुख्यमंत्री होणारे ते तिसरे व्यक्ती ठरतील. ते पहिले असे मुख्यमंत्री असतील ज्यांच्या आई-वडिलांनीही या पदावर काम केलेले असेल.

तेजस्वी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1989 मध्ये झाला होता. सोमवारीच त्यांनी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. आकड्यांकडे पाहिल्यास देशाचे सर्वात युवा मुख्यमंत्री हे एमओएच फारुख होते. त्यांनी एप्रिल 1967 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु, तो राज्याचे नव्हे तर केंद्रशासित प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे वयाच्या 31 व्या वर्षी तेजस्वी मुख्यमंत्री झाले तर ते एखाद्या राज्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री ठरतील. 

हेही वाचा- Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा

सतीशप्रसाद बिहारचे सर्वात युवा मुख्यमंत्री
सतीशप्रसाद सिंह हे बिहारचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. त्यांनी जानेवारी 1968 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. डॉ. जगन्नाथ मिश्रा हे 38 व्या वर्षी एप्रिल 1975 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. 

हेही वाचा- Bihar Election : 'तेजस्वी भव: बिहार'; तेजप्रताप यादवांनी दिला लहान भावाला आशीर्वाद

आई-वडीलही होते मुख्यमंत्री

तेजस्वी यादव यांना बहुमत मिळाले तर भारतीय राजकारणात पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांचे आई-वडीलही मुख्यमंत्रिपदी होते. ते एकाच कुटुंबात तीन मुख्यमंत्री होण्याचा अब्दुल्ला कुटुंबाच्या विक्रमाची बरोबरी करतील. यापूर्वी त्यांचे वडील लालूप्रसाद यादव हे 10 मार्च 1990 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा तेजस्वी अवघ्या चार महिन्यांचे होते. लालूप्रसाद हे दोन वेळा मुख्यमंत्री होते. 

हेही वाचा- Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

त्यांच्या मातोश्री राबडीदेवी या 25 जुलै 1997 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्या होत्या. राबडीदेवी यांनी छोट्या-छोट्या कालावधीत 3 वेळा सत्ता सांभाळली. जम्मू-काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला आणि नंतर उमर अब्दुल्ला सीएम झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Results 2020 if tejashwi yadav wins will be the youngest cm