esakal | NDA ला बहुमत तरीही राजदच्या सत्तेसाठी हालचाली; तेजस्वींचे गणित जुळणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election tejaswi yadav

बिहार निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवसांहून अधिक काळ झाला मात्र तरीही सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचे काय अशीही चर्चा सध्या आहे.

NDA ला बहुमत तरीही राजदच्या सत्तेसाठी हालचाली; तेजस्वींचे गणित जुळणार का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांनी बैठकही बोलावली आहे. दुसऱ्या बाजुला राज्यात सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रीय जनता दलानेसुद्धा सत्तेसाठी हालचाली सुरु केल्या असल्याचं म्हटलं जात आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राजदला सरकार स्थापनेसाठी जादुई आकडा गाठणं कठीण असलं तरी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठीच गुरुवारी पक्षाच्या आमदारांची बैठकही घेतली. यामध्ये राजद प्रणित महाआघाडीच्या इतर आमदारांनाही बोलावण्यात आलं होतं. 

राजदची ही बैठक माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झाली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी हालचाली करण्यासाठी चर्चा झाली. बिहार निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवसांहून अधिक काळ झाला मात्र तरीही सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचे काय अशीही चर्चा सध्या आहे. कमी जागा जिंकलेले नितीश कुमार मुख्यमंत्रीपद घेणार का? किंवा भाजप जदयूकडे नेतृत्व देणार का असा प्रश्न आहे.

हे वाचा - Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न

राज्यात सत्ता मिळवण्यासाठी तेजस्वी यादव जुन्या मित्रांशी हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीनुसार एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 122 आमदार हवे आहेत. अशा परिस्थितीत जर महाआघाडीला सरकार स्थापन करायचं असेल तर आणखी 12 आमदार मिळवावे लागतील. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राजदकडून मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी आणि जीतनराम मांझी यांच्या HAM शी संपर्क केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM सोबत चर्चा करत असल्याचं म्हटलं जात आहे. या तीनही पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या 13 होत आहे. जर या पक्षांसोबतची चर्चा झालीच आणि त्यात यश आलं तर महाआघाडीची सत्ता येऊ शकते. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही एनडीएसोबतच आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांची गणिते जुळणार कशी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.