Bihar Election : इमामगंज मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी सध्याच्या मतमोजणीच्या कलांमध्ये मागे आहेत.

पाटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी सध्याच्या मतमोजणीच्या कलांमध्ये मागे आहेत. गया जिल्ह्यातील इमामगंज विधानसभा जागेवरुन ते पिछाडीवर आहेत. या जागेवर राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्यापेक्षा ते मागे आहेत. चौधरी यांनी देखील निवडणुकीच्या आधी जेडीयूला रामराम ठोकत राजदच्या गोटात प्रवेश केला होता. 2015 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जागेवर मांझी यांनी लालू-नितीश यांच्या आघाडीचे उमेदवार नारायण चौधरी यांना जवळपास 30 हजार मतांनी हरवलं होतं. 

हेही वाचा  - Bihar election : प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले भारत बरा होत आहे

त्यावेळी चौधरी यांच्याविरोधात एँटी-इन्कम्बसीचा मुद्दा तेजीत होता. मांझी पहिल्यांदा या जागेवरुन तेंव्हा निवडणूक लढवत  होते, तसेच तेंव्हा राज्यात लालू-नितीश यांच्या आघाडीची हवा होती. असं असताना देखील एनडीएकडून हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या मांझी यांचाच विजय झाला होता. यावेळी नितीश कुमार यांच्या विरोधात असणारा एँटी इन्कम्बसी फॅक्टरचा मांझी यांना फटका बसू शकतो.

माजी स्पीकर उदय नारायण चौधरी इमामगंजमधून 1990, 2000, 2005 फेब्रुवारी आणि 2005 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत. 2010 मध्ये देखील त्यांनी याच जागेवरुन जिंकून ते विधानसभेचे अध्यक्ष बनले होते. मात्र, पाच वर्षांनंतर ते हरले. 2015 च्या निवडणुकीत जीतनराम मांझी यांना इमामगंज जागेवरुन 79,389 आणि उदयनारायण चौधरी यांना 49,981 मते मिळाली होती. उदय नारायण चौधरी तेंव्हा जेडीयूचे उमेदवार होते.

हेही वाचा - Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

बिहार विधानसभा निवडणुकीची ही हाय व्होल्टेज निवडणूक चुरशीची ठरत आहे. अटीतटीची या निवडूकीचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीयेत. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत राजद-काँग्रेसच्या महागठबंधनने भाजप-जेडीयू आघाडीला तगडे आव्हान दिले आहे. मतमोजणीपूर्व सर्व अंदाजांनी तेजस्वी यादव यांच्याबाजूनेच संपूर्ण कल दाखवला आहे. मात्र, सध्या या निवडणूकीत चुरस दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Updates ham chief jitanram manjhi lagging back in imamganj constituemcy