पेशंटला मोकळी हवा पाहिजे म्हणून नातेवाइकांनी ICU तून बाहेर आणलं आणि...

सूरज यादव
Thursday, 23 July 2020

एका कुटुंबाने त्यांच्या रुग्णाला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमधून बाहेर काढलं. रुग्णाला मोकळ्या हवेची गरज आहे असं उत्तर चक्क नातेवाइकांनी डॉक्टरांना दिलं.

पटना - बिहारमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानं परिस्थिती कठीण बनली आहे. दररोज रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, भागलपूर इथल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्याने हे रुग्णालय कोविड स्पेशल केलं आहे. इथं एका रुग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता त्याला रुग्णालयातून बाहेर नेलं. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

भागलपूरच्या या रुग्णालयात एकूण 800 बेड आहेत. मात्र रुग्णालयात उपचारांसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात डॉक्टर आणि स्टाफ नाही. यातच बेजबाबदारपणा समोर आला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एका कुटुंबाने त्यांच्या रुग्णाला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमधून बाहेर काढलं. रुग्णाला मोकळ्या हवेची गरज आहे असं उत्तर चक्क नातेवाइकांनी डॉक्टरांना दिलं. नातेवाइकांच्या या कृतीला डॉक्टरांनी विरोध केल्यानंतरही रुग्णाला बाहेर नेण्यात आलं. 

हे वाचा - मास्क न घालणाऱ्यांना घडणार अद्दल; होणार तब्बल १ लाखांचा दंड

रुग्णाला बाहेर नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार 19 जुलैला घडला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णाचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा त्याला कटिहार इथं नेलं जात होतं. डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध रुग्णाला आयसीयूमधून बाहेर नेलं जात होतं. कुटुंबियांनी असा आरोप केला होता की, रुग्णालयात योग्य उपचार केले जात नाहीत. 

दरम्यान, या सर्व प्रकारावर डॉक्टरांनी एक व्हिडिओ तयार करून नातेवाइकांवर आरोप केला आहे. यात म्हटलं की, रुग्णाला आयसीयू बेड आणि ऑक्सिजन ट्रॉलीसह बाहेर ओढण्यात आलं. यावेळी कोणीच मास्क घातले नव्हते. जेव्हा डॉक्टरांनी अडवलं तेव्हा नातेवाइकांनी धमकी त्यांना धमकी दिली. जेव्हा नजर चुकवून रुग्णाला आयसीयूमधून नेल्याचं समोर आल्यानंतर डॉक्टरांनी या प्रकरणी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे वाचा - खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी बापानेच 4 महिन्यांच्या चिमुकलीला विकलं

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर रुग्ण उपचारात सहकार्य करत नसतील तर कोरोनाशी लढायचं कसं? बिहारच्या बहुतांश रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे. पटनातील नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील काही दृश्ये समोर आली होती. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन सर्व काही ठीक असल्याचाही दावा केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar medical hospital icu bed patient died