घ्या! मुतखड्याच्या ऑपरेशनवेळी डॉक्टरने काढली किडनी; म्हणाले, सो सॉरी! चूक झाली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

काही घटना अशा असतात की ज्यावर काय व्यक्त व्हावं हेच कळत नाही.

पाटणा : काही घटना अशा असतात की ज्यावर काय व्यक्त व्हावं हेच कळत नाही. अशीच अवाक करणारी एक घटना बिहारमधील पाटणामध्ये घडली आहे. एका रुग्णाच्या मुतखड्याच्या ऑपरेशनवेळी डॉक्टरने चक्क रुग्णाची डाव्या बाजूची किडनीच काढून टाकल्याची घटना घडलीय. ऑपरेशननंतर हॉस्पिटलने जेंव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना काढलेली किडनी दिली तेंव्हा बराच गदारोळ झाला. मात्र, डॉक्टरांनी आपली चूक कबूल केलीय. तसेच दुसऱ्या किडनीच्या दुरुस्तीचा सगळा खर्च स्वत: करण्याच्या आश्वासनानंतर हा मामला तिथेच थंड झाला. या घटनेतील रुग्ण हा बेगूसरायचा युवक आहे. 

हेही वाचा - 'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'
बेगूसरायमध्ये राहणारा हा 26 वर्षीय युवक काही दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होता. दोन दिवसांपूर्वी तो पाटणातील कंकडबागमधील बीजीबी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी गेला. तपासणीनंतर मुतखड्याच्या त्रासामुळे पोटदुखी होत असल्याचे निष्पन्न झाले. ऑपरेशन करुन हा मुतखडा काढावा लागणार असल्याचं नातेवाईकांना कळवण्यात आलं. त्यानुसार, ऑपरेशन करण्यातही आले. मात्र, ऑपरेशन केल्यानंतर समजलं की डॉक्टरने उजव्या किडनीऐवजी डाव्या किडनीचे ऑपरेशन करुन ती काढून टाकली आहे. 

हेही वाचा - इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले
रुग्णाच्या भावाने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी हे ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने केले आहे. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. यामुळे अनेक स्थानिक लोक जमा झाले. मात्र, या हॉस्पिटलने दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्या खर्चाने उपचार करण्याचे वचन दिल्यावर हे प्रकरण शांत झाले. या घटनेबाबत बीजीबी हॉस्पिटलचे डॉ. पीके जैन यांनी म्हटलंय की, तरुणाच्या दोन्ही किडन्यांमध्ये मुतखडा होता. तसेच लघवी करताना रक्तदेखील येत होतं. तपासणीत फक्त डाव्या बाजूच्या किडनीच्या त्रासाबाबत समजलं. ऑपरेशनवेळी डाव्या किडनीमध्ये देखील मुतखडा आढळला. ऑपरेशन दरम्यान रक्त थांबत नव्हतं. नाईलाजाने रुग्णाला वाचवण्यासाठी किडणी काढावी लागली जी रुग्णाच्या नातेवाईकांना सोपवण्यात आली आहे. त्यांनी हे मान्य केलं की चूक झालीय. मात्र, नातेवाईकांच्या सहमतीनंतर त्या तरुणाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आता हॉस्पिटलकडून करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Patna doctor removed kidney of a patient in name stone surgery

Tags
टॉपिकस
Topic Tags: