बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार; 20 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Sunday, 29 September 2019

बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार निर्माण झाला असून, विविध ठिकाणांवर इमारती आणि झाडे कोसळून आत्तापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार निर्माण झाला असून, विविध ठिकाणांवर इमारती आणि झाडे कोसळून आत्तापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. पाटणा, भागलपूर आणि कैमूर हे तिन्ही जिल्हे जलमय झाले आहेत. या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे.

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार सायंकाळपासून राज्यामध्ये दोनशे मिलिमीटरपेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. एवढा मोठा पाऊस आम्हाला कधीच अपेक्षित नव्हता, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. 

Vidhan Sabha 2019: सोशल मीडिया वॉरला सुरवात; भाजपचा राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत पूरस्थितीचा आढावा घेतला. भागलपूर परिसरामध्ये बरारी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंदिराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. पाटण्याला लागून असणाऱ्या दानापूर भागामध्ये ऑटो रिक्षावर झाड कोसळून तीन महिलांसह एक मुलगी ठार झाली. कैमूर जिल्ह्यामध्ये भाबुआ येथे मातीचे घर कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला. 

Vidhan Sabha 2019 : युतीच्या घोषणेआधीच शिवसेनेने वाटले एबी फॉर्म

नागरी वसाहतींमध्ये पाणी 

पाटण्यामध्ये अनेक रुग्णालये, नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हाल होत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक भागांतील लोकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. पूर्व मध्य रेल्वेने 30 गाड्या रद्द केल्या असून, अनेक मध्यमपल्ल्यांच्या गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar rains At least 20 killed Patna still inundated