Vidhan Sabha 2019: सोशल मीडिया वॉरला सुरवात; भाजपचा राष्ट्रवादीला टोला

टीम ई-सकाळ
Sunday, 29 September 2019

रम्याचे डोस या मालिकेतून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे.

जिथं प्रतिस्पर्धी असतो, तिथं आरोप-प्रत्यारोप हे आलंच. आणि महाराष्ट्रात तर सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचे हरप्रकारे प्रयत्न करणारच!

सध्याच्या काळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आणि सोशल मीडियासारखे अफाट माध्यम त्याच्या जोडीला असल्याने तर समोरच्याला पुरून उरण्याचीच भाषा बोलली जाते. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया हे प्रमुख अस्त्र प्रचारासाठी वापरले जाते आणि त्याचा होणारा परिणामही विलक्षण असल्याचे आढळून आले. थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. 

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये एकमेकांचे डावपेच हाणून पाडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झाले. आता निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर भाजपने सोशल मीडियातून विरोधकांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. 'रम्या' नावाचे काल्पनिक पात्र भाजपने साकारले आहे. रम्याचे डोस या मालिकेतून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. या कार्टूनमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ बिघडलं असून ते आता भंगारात जाणार असल्याचे म्हटले आहे. भाजप महाराष्ट्रने आपल्या फेसबुक पेजवर हे कार्टून प्रसिद्ध केलं आहे.

ईव्हीएम, 370 कलम असो किंवा भगवा झेंडा... दोघांची मत परस्परविरूद्ध. दादांनी राजीनामासुद्धा काकांना न विचारताच दिला आणि आता त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायत, “काका सांगतील तो अंतिम निर्णय”. यावर रम्या म्हणतो, "अरे हे घड्याळ ना… एक फटका दिला की थोडावेळ बरोबर चालतंय, पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेनं फिरायला लागतात. हे आता काय दुरूस्त होणार नाही… भंगारातचं जाणार!''

मात्र,  नेटकऱ्यांनी भाजपलाच टार्गेट बनवत शेलक्या भाषेत कानपिचक्या दिल्या आहेत. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्या, गेली 70 वर्षे तुम्ही याच घड्याळात बघून 'अपना टाईम आयेगा' म्हणत मोठे झाला, वेळेनुसार भाजपही बिघडत चालला आहे, रम्याला स्वप्नातही राष्ट्रवादीचेच चेहरे दिसतात...' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदविल्या आहेत.

अजित पवार यांनी दिलेला राजीनामा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि शरद पवार सांगतील तोच अंतिम निर्णय या स्टेटमेंटपर्यंतचा सगळा प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन भाजपने हे कार्टून रेखाटलं आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- बाळाच्या जन्मानंतर सानिया मिर्झाचे ट्रान्सफॉर्मेशन बघा

- कांदा दरवाढीवर केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय; शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप

- सार्वजनिक ठिकाणी घट्ट पेहराव, चुंबन नको!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social media war started between BJP and NCP