बीरभूम हत्याकांड : ममता बॅनर्जींच्या सूचनेनंतर स्थानिक TMC नेत्याला अटक | Birbhum Violence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birbhum violence West Bengal

बीरभूम हत्याकांड : ममता बॅनर्जींच्या सूचनेनंतर TMC नेत्याला अटक

पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे झालेल्या हिंसाचारात लहान मुलांसह आठ जणांची जाळून हत्या झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत कठोर भूमिका घेत बीरभूम हत्याकांडातील सर्व संशयितांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर, अनारुल हुसेन या स्थानिक तृणमूल काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली.

बॅनर्जी यांनी बोगतुई गावात आठ लोकांना जिवंत जाळण्यात आले होते, त्या ठिकाणाला भेट दिली. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यासोबतच त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी आणि नुकसानभरपाई म्हणून पैसे देऊ केले. बॅनर्जी यांनी टीएमसी नेते भादू शेख यांच्या घरीही भेट दिली. भादु शेख यांची हत्या झाल्याचा संशयानंतर ही हत्याकांडाची घटना घडली होती. बॅनर्जी यांनी शेख यांच्या कुटुंबीयांनाही तसाच मदतीचा प्रस्ताव दिला.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "रामपूरहाट हिंसाचार प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी याची पोलीस काळजी घेतील. न्यायालयासमोर एक मजबूत खटला दाखल केला जाईल. या हत्येमागे 'मोठा कट' असू शकतो, ज्याचा व्यापक निषेध केला जात आहे."

त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पोलिसांना TMC नेते आणि रामपुरहाट-1 समुदाय ब्लॉक युनिटचे अध्यक्ष अनारुल हुसैन यांना अटक करण्याचे निर्देश दिले, कारण त्यांनी या भागात संभाव्य अशांततेबद्दल स्थानिकांनी व्यक्त केलेल्या भीतीकडे लक्ष दिले नाही, आणि त्यानंतर ही भयंकर घटना घडली.

हेही वाचा: जिवंत जाळण्यापूर्वी लोकांना बेदम मारहाण; शवविच्छेदन अहवालात खुलासा

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हुसैनच्या घरासह जिल्ह्यातील विविध भागांत झडती घेण्यात आली, त्यानंतर हुसैनला तारापीठ येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर हॉटेलजवळ त्याला पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आठ जणांना जिवंत जाळणे हा घृणास्पद गुन्हा असल्याचे सांगून बॅनर्जी यांनी रामपूरहाट एसडीपीओ शायन अहमद आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली आणि सांगितले की पोलिस सक्रिय असते तर हे टाळता आले असते. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी एसडीपीओला निलंबित केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मी अशा घटनेची कल्पनाही करू शकत नाही. बीरभूममध्ये काही लोकांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात आहे. पोलिस सर्व बाजूंनी तपास करतील. यामध्ये स्थानिक लोकांचा किंवा बाहेरचा लोकांचा सहभाग आहे का हेही ते पाहतील. मला विश्वास आहे की तेथे एक मोठे षड्यंत्र आहे. ”

हेही वाचा: '...निर्लज्जम् सदा सुखी!'; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला चिमटा

त्या पुढे म्हणाल्या की, पोलिसांना राज्यभरातून बॉम्ब आणि बेकायदेशीर बंदुक शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेरील लोकांकडून गावकऱ्यांवर होणार्‍या कोणत्याही संभाव्य हल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात केले जावेत, असेही त्यांनी सांगितले

"मी दोन्ही हत्यांचा (भादू शेख आणि इतर आठ) निषेध करते. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून बोलत आहे. आपण आपल्या प्रियजनांना गमावले आहे, माझे हृदय तुटले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या ऑफरबद्दल, बॅनर्जी म्हणाल्या की त्यांना पहिल्या वर्षासाठी 10,000 रुपये पगारासह 'ग्रुप डी' मध्ये नोकरी दिली जाईल, त्यानंतर त्यांची नोकरी कायम होईल. नंतर, बॅनर्जी यांनी जवळच्या रामपुरहाट शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच जखमींचीही भेट घेतली.

हेही वाचा: लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

Web Title: Birbhum Violence Police Arrests Local Tmc Leader After Instructions Of Mamata Banerjee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..