हरियानात दीड लाख कोंबड्या मारणार; बर्ड फ्लूचा फैलाव रोखणार

पीटीआय
Saturday, 9 January 2021

ओडिशात बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याचे मुख्य सचिव सुरेशचंद्र मोहपात्रा यांनी सांगितलेले असताना शेजारचे राज्य छत्तीसगडमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त जात आहे.

चंडीगड/पंचकुला - हरियानात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे निष्पन्न झाले असून पंचकुलातील पोल्ट्री फार्ममधले नमुने पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सुमारे १ लाख ६० कोंबड्यांना मारण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री जे. पी दलाल यांनी सांगितले. 

रायपूर राणी ब्लॉक येथील सिद्धार्थ पोल्ट्री फार्म, नेचर पोल्ट्री फार्म येथील नमुने भोपाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते नमुने पॉझिटिव्ह असल्याचे दलाल म्हणाले. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील प्राण्यांना ठार करण्याचे आदेशात आहेत. त्यामुळे पाच पोल्ट्री फार्ममधील सुमारे १ लाख ६६ हजार कोंबड्या मारण्यात येतील. याशिवाय पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील चाचणी केली जाणार आहे. त्यांनाही रोगप्रतिबंधक औषधे दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसात हरियानात सुमारे चार लाख कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. पंचकुलाचा बारवाला-रायपूर राणी भाग हा देशातील सर्वात मोठ्या पोल्ट्री फार्मच्या भागापैकी एक समजला जातो. तेथे शंभराहून पोल्ट्री फार्म असून तेथे ७० ते ८० लाख कोंबड्या आहेत. 

Farmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा...

छत्तीसगडमध्ये चार कावळे मृत 
ओडिशात बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याचे मुख्य सचिव सुरेशचंद्र मोहपात्रा यांनी सांगितलेले असताना शेजारचे राज्य छत्तीसगडमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त जात आहे. छत्तीसगडच्या बालोड जिल्ह्यात चार कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्याचे नमुने भोपाळला पाठवले आहेत. पोंडी गावात गेल्या काही दिवसांत कावळे मृत झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

कर्नाटक सीमेवर दक्षता 
कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यात ६ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून सीमाभागात दक्षता बाळगली जात आहे. उत्तराखंडच्या पशुपालन विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 

काश्‍मीर आणि यूपीत सजगता 
हरियाना आणि हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने जम्मू काश्‍मीरमध्ये पोल्ट्रीच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. आजपासून पोल्ट्रीशी निगडित सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सोनभद्रच्या डाला परिसरात दहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने भोपाळला पाठवले आहेत. 

फेसबुकने Like बटण हटवलं; पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये केला बदल

मध्यप्रदेशात ४०० कावळे मृत 
मध्य प्रदेशात दहा जिल्ह्यात आतापर्यंत ४०० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तेथे २९ डिसेंबर रोजी बर्ड फ्लूची पहिली घटना उघडकीस आली होती. मध्य प्रदेशने दक्षिण राज्यातील चिकन आयातीवर दहा  दिवस बंदी घातली आहे. 

हिमाचल प्रदेशात ३ हजार पक्ष मृत  
हिमाचल प्रदेशमध्ये सरकारने बर्ड फ्लूमुळे ॲलर्ट जारी केला आहे. राज्यात काही दिवसांपासून मासे, कोंबड्या, अंड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. पौंग धरण क्षेत्रात आतापर्यंत ३ हजार पक्षी मृत झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird flu outbreak Haryana kill half a million hens