Bird Flu: केरळमध्ये 'बर्ड फ्लू'ची साथ; राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचलमध्येही शिरकाव

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 5 January 2021

या आजाराने केवळ पक्षीच नव्हे तर मनुष्यही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मासे, कोंबड्या आणि अंडीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे

नवी दिल्ली- देशात कोरोनाचा प्रभाव अजून ओसरलेला नसतानाच काही राज्यात आता 'बर्ड फ्लू'ने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केरळमधील कोट्टायम आणि अलप्पुझ्झा जिल्ह्यातील काही भागात बर्ड फ्लू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनाने प्रभावित क्षेत्र आणि त्या परिसरातील 1 किमी भागात बदक, कोंबडी आणि इतर पक्षांना मारण्याचा आदेश जारी केला आहे. 

परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. वन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री के राजू यांनी सांगितले की, अलप्पुझ्झा आणि कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले आहे. परंतु, यामुळे मनुष्याला बाधा होण्याची शक्यता नाही. 

हेही वाचा- अनुभवशून्यतेचा आरोप नका लावू; पुनावालांच्या वक्तव्याला भारत बायोटेकच्या चेअरमन्सनी दिलं उत्तर

तर हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे आंतरराष्ट्रीय रामसर वेटलँड पाँग बांध येथे विदेशातून आलेल्या पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने विदेशी पक्षांची एच5एन1 फ्लूने मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाँग तलावात आतापर्यंत 15 प्रजातींच्या 1700 हून अधिक विदेशी पक्षांनी आपला जीव सोडला आहे. येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. 

बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्य सरकारने सावधानतेचा अलर्ट जारी केला आहे. एवियन इन्फ्लूएंजा व्हायरसने होणाऱ्या या आजाराने केवळ पक्षीच नव्हे तर मनुष्यही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मासे, कोंबड्या आणि अंडीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कांगडातील इंदूर, फतेहपुरा, देहरा आणि जवाली आदी ठिकाणांवर चिकन आणि अंडीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 

हेही वाचा- विनाघटस्फोट दुसऱ्या लग्नामुळे आईचा मुलावरील ताबा संपुष्टात येत नाही; हायकोर्टाचा निर्णय

राजस्थानमध्ये बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू मोठ्याप्रमाणात होत आहे. सोमवारीही राज्यात 110 पक्ष्यांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 500 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील झालावाड येथील राडीतील बालाजी मंदिर परिसरात अजूनही कावळ्यांचे मृत्यू होत आहेत. तेथील एक किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करावी लागली आहे. येथील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. तिथे या पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

या आजारामुळे केवळ पक्षीच नव्हे तर मनुष्यही प्रभावीत होऊ शकतो. कोंबड्या किंवा संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शरीरात बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. झारखंडमध्ये याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Outbreak in Kerala also enter into Rajasthan Madhya Pradesh Himachal pradesh