esakal | बर्ड फ्लू माणसांमध्ये पसरू शकतो? केंद्र सरकारनं दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

कोरोनाचा धोका कमी झालेला नसताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकऱणे आढळली आहेत. 

बर्ड फ्लू माणसांमध्ये पसरू शकतो? केंद्र सरकारनं दिलं उत्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - कोरोनाचा धोका कमी झालेला नसताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकऱणे आढळली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने बर्ड फ्लूच्या नव्या प्रकरणांची नोंद झाली नसल्याचं म्हटलं आहे. तर सध्या या बर्ड फ्लूला घाबरण्याची आवश्यकता नाही असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. भारतात माणसांमध्ये बर्ड फ्लूचा ससंर्ग झालेला नाही आणि तो पसरण्याची शक्यता नाही अशीही माहिती पशुपालन राज्य मंत्री संजीव बालियान यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. 

देशात आतापर्यंत स्थानिक पातळीवरच बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात मदत मिळाली आहे. बालियान यांच्या मते काही राज्यांमधील नमुने एकत्र करून तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. या बातम्यांमुळे चिकन आणि अंड्यांची मागणी कमी झाली असून किंमतही घसरली आहे. देशातील कोणत्याही भागात कोंबड्या किंवा पोल्ट्री उत्पादनामध्ये बर्ड फ्लू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतात बर्ड फ्लू माणसांमध्ये पसरण्याची शक्यता कमी आहे कारण देशात अंडी किंवा इतर पोल्ट्री पदार्थ उकडून किंवा शिजवूनच खाल्ले जातात. 

हे वाचा - आता इंजेक्शनची गरज नाही, नाकातूनही घेता येणार कोरोना लस!

केरळमध्ये बुधवारपर्यंत ६९ हजारांहून अधिक बदक आणि कोंबड्यांना ठार केले. बर्ड फ्लूचा उद्रेक सर्वप्रथम अलप्पुझा जिल्ह्यातील नेदुमुडी, थाकाझी, पल्लिपद आणि करुवत्त या चार पंचायतीत आणि कोट्टायम जिल्ह्यात नंदूर येथे झाला आहे. दोन्ही जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या १९ तुकड्या तैनात आहेत. ज्या भागात संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे, तेथे सॅनिटायजेशन केले जाणार आहे.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री के. राजू म्हणाले की, संसर्गबाधित क्षेत्रात चिकन, मटण आणि अंडी विकण्यास मनाई केली आहे. पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. आतापर्यंत अलप्पुझा येथे ६१,५१३ तर कोट्टायाम येथे ७७२९ पक्ष्यांना ठार करण्यात आले आहे. पक्ष्यांना मारल्यामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

हे वाचा - विषारी वायूची गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू

राजस्थानात ५० कावळे मृत्युमुखी
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा आणि फलोदी भागात बुधवारी सुमारे ५० कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्यांचे नमूने घेण्यात आले आहेत. त्यापैकी २७ कावळे सेतरावा येथे मृत्युमुखी पडले. जोधपूरजवळील केरु गावातही काल कावळे मृत झाले. फलोदी सरोवर क्षेत्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणखी २० कावळे मृत झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी तेथे दोन दिवसांपूर्वी डझनभर कावळे मरण पावले होते.