esakal | देवाप्रमाणे पुजले जाणारे बिरसा मुंडा आहेत तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

birsa munda.

आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात.

देवाप्रमाणे पुजले जाणारे बिरसा मुंडा आहेत तरी कोण?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- महानायक बिरसा मुंडा (Birsa Munda)  यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंडमधील लिहतु या गावी झाला. साल्गा गावातील प्राथमिक शिक्षणानंतर ते चाईबासा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेले. सुगना मुंडा आणि करमी हातू यांचे पुत्र असलेले बिरसा मुंडा यांच्या मनात सुरुवातीपासून ब्रिटिश सरकारविरोधात असंतोष होता. भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांना एक नायक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी झारखंडमध्ये क्रांतीकारी कार्य करुन आदिवासी समाजाची दिशा आणि दशा बदलून नवीन सामाजिक आणि राजनैतिक युगाचा आरंभ केला. 

आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात. बिरसा यांनी मुंडा विद्रोह पारंपरिक भूव्यवस्था बदलण्यासाठी केला होता. जमीनदारांकडून आदिवासींचा होणार छळ संपवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुद्धता, आत्म-सुधार आणि एकेश्वरवादाचा उपदेश दिला. त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयायींना सरकारला कर न देण्याचा आदेश दिला. 

नितीश कुमार सातव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शपथविधीचा दिवस ठरला

लहानपणी बिरसा खूप चंचल होते. ते ब्रिटिशांच्या सानिध्यातच लहानाचे मोठे झाले. त्यांनी लहानपणीचा खूपसा वेळ आखाड्यात घातला. पण, गरीबी असल्याने रोजगारासाठी त्यांना आपले घर वारंवार बदलावे लागले. चाईबासा स्कूलमध्ये चार वर्ष शिकण्याचा बिरसा यांच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झाला. 1895 पर्यंत बिरसा मुंडा एक यशस्वी नेता म्हणून पुढे आले जे लोकांमध्ये जागरुकता पसरवू पाहात होते. 1894 मध्ये दुष्काळादरम्यान बिरसा यांनी आपला मुंडा समुदाय आणि अन्य लोकांसाठी कर माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. 

1895 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि हजारीबाग येथील तुरुंगात त्यांना दोन वर्ष शिक्षा भोगावी लागली. पण, बिरसा आणि त्यांच्या अनुयायींनी आपल्या गरिब जनतेच्या मदतीची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवन काळातच महापुरुष म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांना या भागातील लोक 'धरती बाबा' म्हणून हाक मारायचे. त्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण क्षेत्रातील मुंडा समुदायामध्ये एकत्र येण्याची प्रेरणा जागृत झाली. 

1894 ते 1900 दरम्यान मुंडा समुदाय आणि ब्रिटिश सैनिकांमध्ये युद्ध होत राहिले. बिरसा मुंडा यांनी यादरम्यान इंग्रजांना पुरते हैराण करुन सोडले होते. 1897 मध्ये बिरसा आणि त्यांच्या 400 सैनिकांनी धनुष्यबाणाला शस्त्र बनवत एका पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. 1898 मध्ये तांगा नदीच्या किनारी मुंडा आणि इंग्रज सैनिकांमध्ये युद्ध झाले. या युद्धात ब्रिटिश सैन्याला हार पत्करावी लागली, पण पुढील काळात ब्रिटिशांनी या भागातील आदिवासी नेत्यांना अटक केली. 

योगगुरु रामदेव बाबा म्हणतात, मोदींना पुढील 10 ते 20 वर्षे तरी 'नो ऑप्शन...

1900 मध्ये जेव्हा बिरसा एका जनसभेला संबोधित करत होते, यावेळी डोमबाडी पहाडावर आणखी एक संघर्ष झाला. यात अनेक महिला आणि लहान मुले मारले गेले. यानंतर बिरसा मुंडा यांच्या काही अनुयायींना अटक करण्यात आली. शेवटी 3 फेब्रुवारी 1900 मध्ये चक्रधरपूरमध्ये त्यांना अटक करण्यात आली. 

9 जून 1900 साली तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ब्रिटिशांनी विष देऊन मारल्याचं सांगितलं जातं, ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार त्यांना कॉलरा झाला होता. बिरसा मुंडा केवळ 25 वर्षाचे जीवन जगले, पण त्यांनी आपल्या जीवनात गरीब आदिवासी समुदायाला जागृत करण्याचं कार्य केलं. त्यांच्यामुळे ब्रिटिशांना कायदा आणावा लागला, ज्यामुळे आदिवासींची जमीन गैर-आदिवासींना विकण्यास बंदी आणण्यात आली. बिरसा मुंडा यांना ओडिसा, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या काही आदिवासी भागात देवाप्रमाणे पुजले जाते.  

(edited by- kartik pujari)

loading image