भाजप रोखतोय शेतकऱ्यांचा निधी; मोदी सरकारवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

पडताळणी केलेली यादी पाठवूनही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेच्या निधीपासून राज्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

कलना - पडताळणी केलेली यादी पाठवूनही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेच्या निधीपासून राज्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता याच शेतकऱ्यांना मदत नाकारत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याचे पूर्बा बर्धमान जिल्ह्यातील कलना येथील जाहीर सभेत खंडन करून ममता यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली असून मोफत पीकविम्याची व्यवस्थाही केली.

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

केंद्राकडून सहा लाख अर्जदारांची यादी पडताळणीसाठी राज्याला पाठविण्यात आली होती. त्यातील अडीच लाख नावांची यादी आवश्यक ती कार्यवाही करून परत पाठविण्यात आली, अशी माहिती ममता यांनी विधानसभेत दिली होती.केंद्राच्या कृषी कायद्यांवरील टीका त्यांनी कायम ठेवली. हे कायदे मागे घेतले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.

गैरकृत्य केलेलेच...
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना तृणमुलमधून काही वरिष्ठ मंत्र्यांची गळती सुरु झाली आहे. याचा खास आपल्या शैलीत समाचार घेताना ममता म्हणाल्या की, ज्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला आहे तेच पक्ष सोडत आहेत. मी गैरकृत्ये खपवून घेत नाही. हे आधीपासून ठाऊक असलेलेच निघून जात आहे. 

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड

ममता उवाच
एक माता सर्व प्रकारची काळजी घेऊन मुलाला लहानाचा मोठा करीत असते, पण तिला गरज असते तेव्हा मुलगा निघून जातो. अशा व्यक्ती पक्षातून निघून गेल्यामुळे पक्षाची स्थिती सरसच होते.
भाजप देऊ करीत असलेले पैसे लोकांनी घ्यावेत आणि मेजवानी झोडण्याचा आनंद लुटावा, पण त्या पक्षाला मते देऊ नयेत.
भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था सरस आहे. 
 गुजरातमधून येणारे नव्हे तर पश्चिम बंगालमधून येणारेच या राज्यात राज्य करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP block farmers funds Chief Minister Mamata Banerjee allegation against Modi government