बलात्काराच्या गुन्ह्याशिवाय चिन्मयानंद यांना अटक

टीम ई-सकाळ
Friday, 20 September 2019

भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार किंवा लैगिंक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नव्हता. आजही त्यांच्याविरोधात अपहरण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

शहाजहानपूर : उत्तर प्रदेशात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना आज अखेर, अटक करण्यात आली. संबंधित विद्यार्थीनीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही जवळपास एक महिना चिन्मयानंद यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांना उत्तर प्रदेश सरकार याप्रकरणात पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत होता. पण, आज, अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

राणे भाजपमध्ये गेल्यानंतर युतीचे काय?

विशेष तपास पथकाकडून चौकशी
स्वामी चिन्मयानंद यांना अटक होणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास अखेर त्यांना अटक करण्यात आली. सध्या उत्तर प्रदेशात चिन्मयानंद यांच्याविरुद्धचे हे प्रकरण गाजत आहे. संबंधित तरुणीला धमकावण्याचे तसेच ठार मारण्याचे ही प्रकार घडले आहेत. एका अपघातात तिचा वकील गंभीर जखमी झाला तर, एका नातेवाईकाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे तिच्या पोलिस संरक्षणात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी संबंधित तरुणीने ५० पोलिसांच्या संरक्षण कड्यासह कोर्टात धाव घेतली होती. तत्पूर्वी, तिने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. तपास पथकाने सूत्रे हाती घेतल्यानंतर संबंधित तरुणीची चौकशी केली तिच्या होस्टेलला भेट दिली. तसेच चिन्मयानंद यांचीही चौकशी केली होती.

नासालाही सापडला नाही विक्रम लँडर

काय आहे प्रकरण?
लॉ कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने वर्षभर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. डोक्यावर बंदूक लावून तिला चिन्मयानंद यांच्या रूमपर्यंत आणण्यात आल्याचा आरोपी तिने केला आहे. त्यानंतर तिने याचा पुरावा गोळा करण्यासाठी चष्म्यातील कॅमेऱ्याद्वारे स्टिंग ऑपरेशन केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतरही चिन्मयानंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्यांना अटकही झाली नाही. त्यांच्यावर बलात्कार किंवा लैगिंक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नव्हता. आजही त्यांच्याविरोधात अपहरण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

पक्षांतर करणाऱ्यांना जागा दाखवणार : शरद पवार

कोण आहेत चिन्मयानंद?
स्वामी चिन्मयानंद (वय ७३) हे उत्तर प्रदेशातील भाजपचे बडे नेते आहेत. उत्तर प्रदेशात ते अनेक ठिकाणी आश्रम चालवतात तसेच त्यांच्या काही शैक्षणिक संस्थादेखील आहेत. त्यांचे मूळ नाव कृष्णपाल सिंह असे आहे. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रात मंत्री होते. उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. त्यापूर्वीही त्यांनी बदौन आणि मछलीशिहर मतदारसंघांचेही प्रतिनिधीत्व केले होते. यापूर्वीही त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. २०११मध्ये त्यांच्या आश्रमातीलच एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. ऑगस्ट २०१९मध्ये पुन्हा एका विद्यार्थीनीने त्यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला. ते प्रकरण सध्या खूप गाजत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक होत नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader Chinmayanand arrested on allegations of rape by law student