
महात्मा गांधी यांची जयंती अथवा पुण्यदिन जवळ आला की काही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका हमखास सुरु होते.
भोपाळ : महात्मा गांधी यांची जयंती अथवा पुण्यदिन जवळ आला की काही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका हमखास सुरु होते. कालच ग्वालियरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसे कार्यशाळा (Godse Study Center ) सुरु करण्यात आली आहे. हिंदू महासभेने हा कार्यक्रम सुरु केला असून या माध्यमातून ते नथुराम गोडसेच्या देशभक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. एकीकडे यावर उलटसुलट चर्चा सुरु असताना दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याने पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. या नेत्याने म्हटलंय की, महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली आहे. हे विधान मध्य प्रदेशमधील विधानसभेचे प्रोटेम स्पीकर असलेल्या रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर चर्चा सुरु आहे. शेतकरी सन्मान कार्यक्रमात हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.
महात्मा गांधी की भूल की वजह से देश का विभाजन हुआ :
मध्यप्रदेश के प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा का बयान #MahatmaGandhi #Gandhi pic.twitter.com/T0iTsyyExy
— News24 (@news24tvchannel) January 11, 2021
हा कार्यक्रम भोपाळमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित रामेश्वर शर्मा यांनी बोलताना भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवलं. ते म्हणाले की, कसाय... नावांमुळे खरे तर गैरसमज होतात. दिग्विजय सिंह यांचं काम आणि एकूण व्यवहार हा मोहम्मद अली जिना यांच्यापेक्षाही जास्त धोकादायक आहे. याआधी जिनांनी देशाचं विभाजन केलं होतं. 1947 मध्ये बापूंकडून चूक झाल्यामुळे देशाचे दोन तुकडे पडले होते. तसेच विभाजन दिग्विजय सिंह करत आहेत, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - 'तरुणांनी धरावी नथुरामची वाट'; हिंदू महासभेने सुरु केलं 'गोडसे स्टडी सर्कल'
रामेश्वर शर्मा हे आपल्या वादग्रस वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, दगडफेक करणाऱ्यांचं काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावं. काँग्रेसने दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कुणालाच नाही. त्यामुळेच सरकार कडक कायदे करण्यावर काम करत आहे.