काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणार आहे का?, भाजपचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

पाकिस्तानमधील मंचावरुन भारताला बदनाम करणारे वक्तव्य केले म्हणून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानमधील मंचावरुन भारताला बदनाम करणारे वक्तव्य केले म्हणून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. थरुर पाकिस्तानमध्ये भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला पाकिस्तानमध्ये निवडणूक लढायची आहे का ? असा सवाल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. तसेच शशी थरुर यांनी भारताची थट्टा केली आहे. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.  

शशी थरुर हे पाकिस्तानच्या व्यासपीठावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारतात मुसलमान आणि ईशान्य भारतातील नागरिकांविरोधात भेदभाव होत असल्याचे म्हटले होते. भारतात एकमेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चिनी लोकांसारखे दिसणारे लोक म्हणून ईशान्य भारतातील नागरिकांबरोबर भेदभाव केला जातो, असे त्यांनी सांगितले. तसेच तबलिगी जमातचा उल्लेख करत कोरोना काळात मुसलमानांना त्रस्त करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा- चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

त्यांच्या या वक्तव्याचा संबित पात्रा यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, भारतासारखा लोकशाही असलेला दुसरा देश नाही. इथे प्रत्येकाची काळजी घेतली जाते. थरुर यांनी पाकिस्तानी माध्यमांसमोर भारताबद्दल वाईट गोष्टी सांगितल्या. भारताचा एक खासदार अशा प्रकारचे वक्तव्य कसे करु शकतो. तबलिगी जमातबरोबर कोणत्या प्रकारचा पक्षपात भारत सरकार करत आहे, असा सवाल त्यांनी केला. शशी थरुर या सर्व गोष्टी पाकिस्तानमध्ये जाऊन बोलत आहेत.

थरुर यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर कशाप्रकारचे अत्याचार होत आहेत, हे पाकिस्तानला विचारण्याची हिंमत केली का? तिथे दररोज हिंदू, ख्रिश्चन आणि शिखांबरोबर काय होत आहे. तिथे एखाद्या अल्पसंख्याकाचे अपहरण, बलात्कार आणि हत्या या सर्वसाधारण गोष्टी आहेत. अखेर या लोकांना काय हवं आहे? त्यांना पाकिस्तानमध्ये निवडणूक लढायची आहे का?, असा सवाल त्यांनी केला. 

हेही वाचा- BIhar Election : चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल; म्हणाले, मी मोदींचा आदर का करु नये?

राहुल गांधी हे चीन आणि पाकिस्तानमध्ये आधीच 'हिरो' बनले आहेत. त्यांनी कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शेकडो नागरिक मारले गेल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याचा उल्लेख केला होता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader sambit patra slams on congress shashi tharoor for defamatory statement on india