‘एनडीए’च्या विस्ताराचा भाजपचा रोडमॅप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP NDA expansion Raj Thackeray Captain Amarinder Singh Sajjad Lon

‘एनडीए’च्या विस्ताराचा भाजपचा रोडमॅप

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आता भाजप आघाडीचा (एनडीए) विस्तार करण्याचा महत्वाकांक्षी रोडमॅप आखला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पंजाबचे कॅप्टन अमरिंदरसिंग व जम्मू-काश्मीरचे सज्जाद लोन यांच्यासह अनेक प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’च्या छत्राखाली आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला. ‘एनडीए’मध्ये सध्या २७ पक्ष आहेत त्यांची संख्या वाढविण्यासाठी पक्षाने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजप सूत्रांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता विखुरलेल्या विरोधी पक्षांच्या आणि गलितगात्र काँग्रेसच्या आव्हानाचा खूप गंभीरपणे विचार करावा अशी परिस्थिती नाही. मात्र भाजप नेतृत्व सध्याच्या काँग्रेससह कोणत्याच विरोधकांना कमजोर मानत नाही त्यामुळेच एनडीएच्या विस्ताराची ‘आसेतुहिमाचल योजना’ हाती घेतल्याचेही पक्षनेते सांगतात. या मालिकेत महाराष्ट्रात राज ठाकरे, काश्मिरात सज्जाद लोन, पंजाबमध्ये अमरिंदर सिंग, मध्यप्रदेशात गोंडवाना गणतंत्र पक्ष, पश्चिम बंगालमधील ‘भद्र' समाजावर प्रभाव टाकणारे प्रादेशिक पक्ष यांना ‘एनडीए’बरोबर कायम ठेवण्याचे किंवा जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज ठाकरे यांनी लाउडस्पीकरचा मुद्दा हाती घेतला तो दिल्लीपर्यंत गाजत आहे. ठाकरे यांची शैली व यांच्या सभांना जमणारी तुफान गर्दी पाहता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच त्यांना ‘एनडीए’शी जोडून घ्यावे, असा भाजपच्या महाराष्ट्र नेतृत्वाचा आग्रह आहे. ठाकरे यांना सोबत घेतले तर यूपी-बिहारमध्ये कितपत फटका बसू शकतो याबाबत पक्षाने काही सर्वेक्षणेही केल्याची माहिती आहे. पक्षनेत्यांच्या मते राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेचा विचार करता २०२४ आधी त्यांचा ‘एनडीए’तील प्रवेश होण्यात फारसे अडथळे राहणार नाहीत, असे वातावरण आहे. पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी केलेली आघाडी विधानसभेला अपयशी ठरली तरी कॅप्टन यांचा राज्यातील प्रभाव कायम असल्याचे मोदी-शहा यांचे मत आहे. त्यामुळे २०२४ मध्येही कॅप्टन अमरिंदर यांच्याबरोबरची आघाडी भाजप कायम ठेवणार आहे. सज्जाद लोन बरोबर आले तर कलम ३७० रद्द केल्यावर कायम असलेली खोऱ्यातील धग कमी होऊ शकेल अशी आशा भाजपला आहे. भाजपबरोबर सध्या संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक हे दोनच मोठे पक्ष आहेत. मगोप व रिपब्लिकन आठवले गटासह अन्य प्रादेशिक पक्षही एनडीएचा घटक आहेत. यात उत्तर प्रदेशात निषाद पक्ष व अपना दल, बिहारमध्ये हम, हरियानात दुष्यंत चौताला यांचा जेजेपी, झारखंडमधील आजसू या पक्षांचा एनडीएमध्ये समावेश आहे.

एनडीएचे संख्याबळ

लोकसभा : ५४३ पैकी ३३४ खासदार

राज्यसभा: २४५ पैकी १२० खासदार

राज्यांत : ४०३६ पैकी १७३८ आमदार

१२ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री

भाजपचा ‘प्लॅन बी’

भाजपच्या ‘प्लॅन बी‘ नुसार लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेससह सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आघाडी केलीच तर भाजपला मोठ्या ताकदीने मैदानात उतरावे लागेल. या स्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेबरोबरच या छोट्या छोट्या पक्षांची मदत एनडीएसाठी लक्षणीय ठरेल.

Web Title: Bjp Nda Expansion Raj Thackeray Captain Amarinder Singh Sajjad Lon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top