esakal | ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं

ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात भाजपने भवानीपूर मतदारसंघामध्ये प्रियांका टिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच ममतांविरोधात प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची फळीही उतरविण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे.

हेही वाचा: लसीकरणामध्ये प्रगत राष्ट्रांपेक्षाही पुढे आहेत भारतातील 'ही' राज्ये

समशेरगंज आणि जांगीपूर येथेही अनुक्रमे मिलन घोष तसेच सुजीत दास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिब्रेवाल यांची उमेदवारी आज जाहीर झाली. व्यवसायाने वकील असलेल्या टिब्रेवाल या केंद्रात मंत्री राहिलेल्या आणि आता राजकारण संन्यासाची घोषणा करणाऱ्या बाबूल सुप्रियो यांच्या विधी सल्लागार होत्या. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकही त्यांनी लढविली होती. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध त्या ५८ हजारहून अधिक मतांनी पराभूत झाल्या होत्या. ममता बॅनर्जींचा भवानीपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणाऱ्या ममता यांना ही निवडणूक अवघड नाही, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील नंदिग्रामच्या निकालाची पुनरावृत्ती भवानीपूरमध्ये करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार मतांसाठी अफगाणिस्तान मुद्द्याचाही वापर करेल - काँग्रेस

‘सरकार तुमच्या दारी’ला प्रतिसाद

कोलकता ः पश्‍चिम बंगालमधील सरकारच्या जनहितासाठी सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी सुरू केलेल्या ‘दुआरे सरकार’ (सरकार तुमच्या दारी) मोहिमेचा लाभ तीन कोटीपेक्षा जास्त लोकांनी घेतला, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दिली. या उपक्रमाचा दुसरा टप्पा १६ ऑगस्टला सुरू झाला असून येत्‍या १५ पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल बॅनर्जी यांनी नागरिकांचे आभार मानले.

हेही वाचा: लसीचं KYC व्हेरिफिकेशन करता येणार; कोविन पोर्टलवर सुविधा

कॉंग्रेस चार हात दूर

कॉंग्रेसने पोटनिवडणुकीमधून अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधी ऐक्यासाठी तृणमूल कॉंग्रेसला दुखावले जाऊ नये या धोरणांतर्गत कॉंग्रेसने ममता बॅनर्जींविरुद्ध भवानीपूरमधून उमेदवार देण्याचे टाळले आहे. मात्र, कॉंग्रेसचा मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार मैदानात उतरविण्याची घोषणा केली आहे.

loading image
go to top