
'तिबेटी लोकांचं मन बदलण्यात चीनी कम्युनिस्ट पक्ष पूर्णपणे अपयशी ठरलाय.'
'चीनच्या दबावानंतरही तिबेटीयन नागरिकांच्या मानसिकतेत कोणतीही बदल नाही'
चीनचा (China) सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष (Communist Party) तिबेटची (Tibet) मानसिकता बदलण्यात अपयशी ठरलाय, असं परखड मत तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांनी व्यक्त केलंय. दलाई लामांनी धर्मशाला (Dharamshala) इथं तिबेटी समस्यांसाठी उजरा झेया या अमेरिकन अधिकाऱ्याशी बोलताना ही माहिती दिलीय. दरम्यान, अमेरिकेच्या विशेष समन्वयक उजरा झेया (Uzra Zeya) या भारत भेटीवर धर्मशाला इथं आल्या असताना त्यांनी दलाई लामांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी दलाई लामांनी त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना भारत आणि अमेरिकेचं (America) कौतुक केलंय.
अमेरिकेचे विशेष समन्वयक उजरा झेया यांनी धर्मशाला इथं दलाई लामा यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत तिबेटी मानवाधिकारांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान, लोकशाही शासन आणि मानवतावादी प्राधान्यांचा पाठपुरावा करण्यावर विशेष भर देण्यात आला. तिबेटमधील लोकांच्या मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी, चीनवर दबाव आणण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्याचं सांगण्यात येतंय.
दलाई लामांच्या कार्यालयानं जारी केलेल्या व्हिडिओत तिबेटचे धर्मगुरु म्हणाले, तिबेटी लोकांचं मन बदलण्यात चीनी कम्युनिस्ट पक्ष पूर्णपणे अपयशी ठरलाय. म्हणजेच, त्यांच्या सर्व दबावानंतरही तिबेटींच्या मानसिकतेची कोणतीही हानी झालेली नाहीय. चीन वेगानं बदलत आहे आणि आता समाजवाद आणि मार्क्सवाद राहिलेला नाहीय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना स्वातंत्र्य आणि लोकशाहीची प्रदीर्घ परंपरा कशी आहे. यावरही त्यांनी प्रकाश टाकला. बैठकीदरम्यान, दलाई लामांनी त्यांच्या चार मुख्य वचनबद्धतेची रूपरेषा सांगितली. यामध्ये सार्वभौमिक मूल्यांचं संवर्धन, धार्मिक सौहार्दाचं संवर्धन, तिबेटची संस्कृती आणि पर्यावरणाचं रक्षण, शिवाय प्राचीन भारतीय ज्ञानाचं पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे.