
नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपला चारीमुंड्या चीत करत ७० पैकी ६२ जागांवर विजयी पताका फडकावणारे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे येत्या रविवारी (ता.१६) ऐतिहासिक रामलीला मैदानावर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केजरीवालांसह मंत्रिमंडळातील साऱ्या सदस्यांचाही शपथविधी त्याच दिवशी होईल, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. यापूर्वी २०१३ व २०१५ मध्येही केजरीवाल यांनी शपथविधीसाठी चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त निवडला होता. या वेळी मात्र सोळा तारखेला रविवार असल्याने त्याच दिवशी शपथ घेण्याचा निर्णय आपने घेतला आहे.
Manish Sisodia, Aam Aadmi Party (AAP): The entire cabinet will take oath along with the CM-designate Arvind Kejriwal. The ceremony will begin at 10 AM on 16th February at Ramlila Maidan. https://t.co/l4jF7xUzxp pic.twitter.com/4HWesYrhtz
— ANI (@ANI) February 12, 2020
केजरीवाल यांनी आज नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपच्या ६२ नवनिर्वाचित आमदारांचीही बैठक घेतली. यामध्ये केजरीवाल यांची आपच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केजरीवाल यांनी आजच्या बैठकीत, नव्या आमदारांनी जनतेच्या सुविधांना व कामाना सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. आजच्या बैठकीपूर्वी केजरीवालांनी आपचे आमदार व कार्यकर्त्यांना, शपथविधीच्या कार्यक्रमात फक्त भारत माता की जय, इन्कलाब झिंदाबाद व वंदे मातरम याच घोषणा देण्याची सूचना पुन्हा केली. त्याचप्रमाणे धार्मिक विद्वेषपूर्ण वक्तव्ये किंवा तशा वक्तव्यांना प्रत्युत्तर देणे कटाक्षाने टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपच्या आमदारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसला धक्का; 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी
विजयवर्गीय यांना उत्तर नाही
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी, दिल्लीच्या साऱ्या शाळा व मदरशांमध्ये हनुमान चालिसा सक्तीची करा, अशी गरळ आज भल्या सकाळीच ओकल्यानंतर त्याबाबतच्या प्रश्नावर सिसोदिया यांनी एका अक्षरानेही प्रत्युत्तर दिले नाही. आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गुंडांनी केलेल्या हल्ल्यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये केजरीवाल हे त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाइकांचे सांत्वन करणार आहेत.