'रेमन मॅगसेसे पुरस्कार' प्राप्त पद्म विभूषण डॉ. व्ही. शांता यांचं निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

डॉ. व्ही. शांता यांना 2005 साली 'रेमन मॅगसेसे पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं होतं.

चेन्नई : अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या (Adyar Cancer Institute) वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट आणि अध्यक्षा डॉ. व्ही शांता यांचा आज मंगळवारी सकाळी निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. त्यांना 2005 साली 'रेमन मॅगसेसे पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं होतं. तर भारत सरकारने त्यांना 2005 साली पद्मविभूषणने गौरवित केलं होतं. 'नोबेल पुरस्कार' प्राप्त झालेले शास्त्रज्ञ एस. चंद्रशेखर त्यांचे मामा होते तर प्रसिद्ध वैज्ञानिक तसेच नोबेल  पुरस्कार प्राप्त सी. व्ही रामन त्यांच्या आजोबांचे भाऊ होते. डॉ. शांता यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

 

काल सोमवारी रात्री जवळपास 9 वाजता त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं. त्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 3.55 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवास ओल्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात नेलं आहे. हा परिसर त्यांनी आपले गुरु डॉ. कृष्णमूर्ती यांच्या समवेत बनवलं होता.

डॉ. शांता या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधीपासूनच आपल्या कामात सक्रिय होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, त्या काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या. कोरोना महामारीच्या वेळी देखील आरोग्यासंबंधीच्या नव्या आव्हानांमुळे त्या चिंतीत होत्या. त्यांच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये समाजातील सर्वच लोकांना उच्च दर्जाचे उपचार दिले जातात. एखादा रुग्ण पैसे देण्यास सक्षम नसेल तर त्याचा मोफत देखील उपचार केला जायचा.

हेही वाचा - यंदाचा प्रजासत्ताक दिन खास; लढाऊ राफेल परेडमध्ये पहिल्यांदा दाखवणार आपली ताकद

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
डॉ. शांता यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की, डॉ. शांता यांचं उच्च गुणवत्तेच्या कॅन्सर उपचारांसाठीच्या प्रयत्नांसाठी सदैव स्मरण केलं जाईल. अद्यार, चेन्नीमधील कॅन्सर संस्था गरीब आणि दलितांच्या सेवेसाठी सर्वांत पुढे आहे. मला 2018 रोजी या संस्थेचा दिलेली भेट आठवते. मी डॉ. व्ही. शांता यांच्या निधनामुळे दु:खी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer Institute founder V Shanta passes away in Chennai