esakal | महागाई रोखण्यात केंद्र अपयशी; पी. चिदंबरम यांचा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

p chidambaram

महागाई रोखण्यात केंद्र अपयशी; पी. चिदंबरम यांचा हल्ला

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेसने महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरुद्ध देशव्यापी प्रचार मोहीम आखली असून सर्व राज्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांना पत्रकार परिषदांद्वारे सरकारच्या धोरणांवर शरसंधान करण्यास सांगण्यात आले आहे. याअंतर्गत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, इंधनापासून ते खाद्य तेलापर्यंतच्या कडाडलेल्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असल्याचा हल्ला केंद्र सरकारवर चढवला.

हेही वाचा: ऑगस्टमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार; आरोग्य मंत्र्यालयाची ग्वाही

पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक राहील, असे संकेत देताना चिदंबरम यांनी केंद्र सरकार महागाई रोखण्यात पुरते अपयशी ठरल्याची तोफ डागली. जनतेच्या केविलवाण्या स्थितीचा सरकार फायदा घेत असल्याचाही प्रहार चिदंबरम यांनी केला. रिझर्व्ह बॅंकेने चार टक्के महागाईचे उद्दिष्ट ठरविले होते. प्रत्यक्षात महागाईने सहा टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची ताजी आकडेवारी महागाई ६.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दाखवत आहे. खाद्यान्नाची महागाई ५.५८ टक्के झाली असल्याकडे लक्ष वेधून चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर कोरडे ओढले.

हेही वाचा: थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी

चिदंबरम म्हणाले, की वाढत्या इंधन दरासाठी केंद्र सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी भाजपकडून ‘युपीए’ सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरविले जात आहे. मात्र, महागाई वरची सत्ताधाऱ्यांची चिंता केवळ नकाश्रू असल्याचा टोला चिदंबरम यांनी लगावला. तसेच आयात शुल्काचा सरकारने फेरआढावा घ्यावा, आयात होणाऱ्या जीवनावश्क वस्तुंच्या किमतींचा फेरविचार करावा आणि या वस्तुंवरील जीएसटी कमी करावे, अशी सूचनाही चिदंबरम यांनी केली. पुढे ते म्हणाले की, देशात महागाई वाढण्याला केंद्रातील एनडीए सरकारच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे. मंत्र्यांनी महागाई असल्याचे नाकारल्याने प्रत्यक्ष महागाई कमी होणारी नाही. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडरचे दर तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

loading image