केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात भरघोस वाढ?

टीम ई सकाळ
Wednesday, 10 February 2021

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

नवी  दिल्‍ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकार निर्णय कधी घेणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच लक्ष लागून राहिलं होतं. महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असा निर्णय झाल्यास केंद्र सरकारच्या 50 लाख कार्यरत असलेल्या आणि 61 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. 

कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स जाहीर करण्यात आला आहे. यामुळे महागाई भत्त्यात वाढीची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. महागाई भत्ता किती असावा हे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सवरून ठरवलं जातं. 

हे वाचा - सरकार नेमतंय ऑनलाइन स्वयंसेवक; सोशल मीडियावर ठेवणार नजर 

महागाई भत्त्यासह कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवास भत्त्यातही वाढीची शक्यता आहे. याचा फायदा सध्याच्या कर्मचाऱ्यांसह निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळेलय. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जर चार टक्के वाढ झाली तर प्रवास भत्ताही चार टक्के वाढू शकतो. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा अद्याप केलेली नाही.

भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 या कालावधीत महागाई भत्ता देण्यात येणार नाही. कोरोनामुळे एप्रिल महिन्यातच केंद्र सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सरकारने स्पष्ट केलं होतं की, जून 2021 पर्यंत महागाई भत्ता देण्यात येणार नाही. 

हे वाचा - मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुमदुमली लोकसभा; आज PM मोदी-राहुल गांधी आमनेसामने

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि डियरनेस रिलिफ दिले जात नसून महागाई भत्ता 17 टक्के इतका दिला जातो. जर सरकारने भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला तर 4 टक्के वाढीसह तो 21 टक्के इतका होईल. तसंच सोबत प्रवास भत्ताही वाढले. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government may announce 4 per cent increase da