New Parliament of India : चाणाक्यांपासून ते आंबेडकरांपर्यंत नव्या संसदेतील अप्रतिम कलाकृती! सुरक्षाही चोख

New Parliament of India
New Parliament of India

New Parliament of India :  आज देशभरात ऐतिहासिक क्षण आहे. कारण आज दिल्लीत लोकशाहीचे नवीन मंदिर उभे राहीले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, २८ मे २०२३) रोजी देशाचे नवीन संसद भवन राष्ट्राला समर्पित केले. मोदी सरकारने अत्यंत कमी कालावधीत नवीन संसद भवनाचे काम पूर्ण केले. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे.

देशाचे नवे संसदभवन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार येथे पाहायला मिळेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे नवे भवन तयार झाले असल्याने त्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार तसेच कारागिरांनी विक्रमी वेळेमध्ये वास्तूच्या उभारणीचे काम पूर्ण केले आहे.

अशोकचक्र -

अशोकस्तंभासाठीच्या उभारणीची सामग्री ही महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानातील जयपूर येथून मागवण्यात आली होती. लोकसभा आणि राज्यसभेच्या महाकाय भिंतींवर आणि संसदेच्या बाहेर लावण्यात आलेले अशोकचक्र खास इंदूरमधून मागविण्यात आले आहे. दगडांचे कोरीव काम आबू रोड आणि उदयपूर येथील मूर्तिकारांनी केले आहे. हे दगड राजस्थानातील कोटपूतली येथून आणण्यात आले आहेत. खास बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या विटा हरियाणा आणि उत्तरप्रदेशातून मागविण्यात आल्या आहेत.

सगळ्या देशाचे प्रतिबिंब

नव्या संसद भवनामध्ये देशाची झलक पाहायला मिळेल. सभागृहातील जमिनीवर बांबूचे आच्छादन टाकण्यात आले असून त्यावरील वस्त्रप्रावरण हे मिर्झापूरमध्ये तयार करण्यात आलेले आहे. विविध ठिकाणांवर रंगरंगोटीसाठी वापरण्यात आलेले लाल आणि पांढऱ्या रंगाचे खडे राजस्थानातील सरमथुरा येथून आणण्यात आले आहेत. बांधकामाची वाळू चरखी दादरी येथून आणण्यात आली असून सभागृहातील अंतर्गत सजावटीसाठीचे सागवान लाकूड नागपूरहून मागविण्यात आले आहे.

मुंबईत तयार झाले फर्निचर

संसदभवनाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेला केशरी हिरव्या रंगाचा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा येथून तर पांढऱ्या रंगाचे संगमरवर राजस्थानच्या अंबाजी येथून आणण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सीलिंगसाठी वापरण्यात आलेले स्टील दमण आणि दीव येथून आणण्यात आले आहे. संसदेतील सगळे फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे. दगडांच्या जाळ्यांची कामे राजस्थानचे राजनगर आणि नोएडा येथे करण्यात आली आहेत.

New Parliament of India
Sengol Of India : पंडित नेहरुंनाही सेंगोल मिळाला, पण माऊंटबॅटनकडून नाही; काँग्रेसचा दावा खरा की खोटा?
New Parliament of India
New Parliament of India

सेंगोल -

संसद भवनात ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेले ऐतिहासिक सेंगोल ठळकपणे स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी याची स्थापना केली. या सेंगोलला खूप महत्त्व आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तामिळनाडूतून हे सेंगोल मिळाले आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचं प्रतीक म्हणून स्वीकारलं. हे ब्रिटीशांकडून या देशातील लोकांकडे सत्ता हस्तांतराचे प्रतीक आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सेंगोलची भारतीय संस्कृती, विशेषत: तामिळ संस्कृतीत महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली होती. चोळ राजवटीचा माग काढत त्यांनी त्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर जोर दिला. चोळ राजवंश स्थापत्य, कला आणि साहित्य आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी विलक्षण योगदानासाठी प्रसिद्ध होता. चोळ राजांच्या सामर्थ्याचे, वैधतेचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेले सेंगोल हे चोळ राजवटीचे प्रतीक म्हणून उदयास आले. सेंगोल हे वारसा आणि परंपरेचे प्रतीक म्हणून पूजलं जातं. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि महत्त्वपूर्ण समारंभांचा अविभाज्य भाग म्हणून काम करतं. सेंगोल तमिळ संस्कृतीच्या समृद्ध इतिहास आणि वारशाचा सन्मान करते.

आतील दृश्य -

एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या, संसदेतील ६ गेट्स आणि सार्वजनिक रस्त्यांवर देशाच्या विविध भागातून आणलेल्या सजवलेल्या कलेची झलक पाहायला मिळेल. देशात पुजल्या जाणार्‍या प्राण्यांची झलकही येथे पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गरुड, गज, अश्व आणि मगर यांचा समावेश होतो. येथे तीन गॅलरी समाविष्ट केल्या जातील, ज्यात भारताचा ऐतिहासिक ते आधुनिक काळातील प्रवास दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

७५ फूट उंचीची दोन पितळी भित्तीचित्रेही असतील असे सांगण्यात येत आहे. यापैकी एकावर भारतीय वारसा आणि संस्कृती कोरली जाणार आहे. दुसरीकडे, समुद्रमंथनाची कथा सांगितली जाईल. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे माजी प्रमुख अद्वैत गणनायक सांगतात की, संसदेच्या नवीन इमारतीत देशाचा इतिहास आणि २१व्या शतकातील चित्रही दाखवले जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभाई पटेल यांची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे.

७५ कलाकारांचे प्रयत्न -

नवीन संसद कलात्मक दुष्ट्या सजवण्यासाठी सुमारे ७५ कलाकारांची मेहनत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'सर्व धार्मिक संलग्नतेच्या आधारे संसदेतील कला भारताचे आध्यात्मिक चित्र दर्शवेल.'

तीन विशेष दरवाजे असतील

नवीन संसद भवनात तीन नवीन दरवाजे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत, जे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार म्हणून ओळखले जातील. या इमारतीत महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि चाणक्य यांचे ग्रेनाइटचे पुतळे बसवण्यात येणार आहेत.

नवे संसद भवन


बांधकामाचा कालावधी १० डिसेंबर २०२० ते २८ मे २०२३ सुमारे अडीच वर्षे

बांधकामाचा खर्च ९७१ कोटी

निर्मिती - टाटा प्रोजेक्ट्‌स लि.

क्षेत्रफळ - ६४ हजार ५०० चौरस मीटर

वास्तुरचनाकार - एचसीपीएल डिझाईन, प्लॅनिंग ॲंड मॅनेजमेंट प्रा. लि.

आसन क्षमता

राज्यसभा - ३८४

लोकसभा - ८८८

New Parliament of India
New Parliament Building Inauguration: नव्या संसदेच्या पहिल्या भाषणात काय म्हणाले PM मोदी...

नवे संसद भवन अत्याधुनिक सायबर प्रणालीनं सुसज्ज -

सध्याच्या संसद भवनावर १३ डिसेंबर २००१ रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये ९ सुरक्षा जवान शहीद झाले होते. त्यानंतर संसदेची सुरक्षा व्यवस्था सातत्याने कडक करण्यात आली होती. त्या घटनेपासून धडा घेत देशातील आणि जगातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नवीन इमारतीत सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवीन इमारतीत सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज सुरक्षा दल, अग्निशमन यंत्रणा यासह अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नव्या संसदेची सुरक्षा सध्याच्या इमारतीपेक्षा कितीतरी पटीने चांगली असेल. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपासून ते थर्मल इमेजिंग सिस्टीम, आय कार्ड, सिक्युरिटी ऑपरेटिंग सेंटर्सपर्यंत सर्व काही आधुनिकीकरण करण्यात आले

नवीन संसद भवनात सुरक्षा देखील चोख असणार आहे. देशाच्या नवीन संसद भवनात अनेक वैशिष्ट्ये आहेत. नवे संसद भवन अत्याधुनिक सायबर प्रणालीनं सुसज्ज आहे. ज्या तज्ञांनी ही प्रणाली तयार केली आहे त्यांनी याला 'अत्याधुनिक' सायबर सुरक्षा असं नाव दिलं आहे. या प्रणालीला 'प्रो अॅक्टिव्ह सायबर सिक्युरिटी' असंही म्हटलं जातं.

चीन, पाकिस्तानसह इतर कोणत्याही देशाचे हॅकर्स नवीन संसद भवनात घुसू शकत नाहीत. इतकंच नाही तर संसद भवनाची सायबर सुरक्षा व्यवस्था इतकी मजबूत आहे की ती सायबर क्राईमच्या डार्क वेबला, ज्याला 'इंटरनेटचे अंडरवर्ल्ड' म्हणूनही ओळखलं जातं, ते या संसदेच्या आयटी प्रणालीच्या जवळपासही जाऊ देणार नाही.

नवीन संसद भवनात फुलप्रूफ सायबर यंत्रणा तयार करणाऱ्या टीममधील सूत्रांचं म्हणणं आहे की, कोणताही हॅकर इथे घुसू शकत नाही. यामुळेच याला 'स्टेट ऑफ आर्ट' म्हटलं गेलं आहे. संसद भवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात 'डिजिटल सर्व्हेलन्स'चा गराडा असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीही मदत घेण्यात आली आहे. दुहेरी सुरक्षा कार्यप्रणाली कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

संसद भवनात एकात्मिक इंटरनेट नेटवर्क व्यतिरिक्त एअर-गॅप्ड संगणक तंत्रज्ञान देखील असेल. एअर गॅप संगणक प्रणालीमुळे डेटाला मालवेअर आणि रॅन्समवेअरपासून संपूर्ण संरक्षण मिळते.याला इंट्रानेटही म्हणतात, म्हणजे उर्वरित नेटवर्कपासून वेगळी प्रणाली. नवीन संसद संकुलातल्या सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (SOC) द्वारे २,५०० इंटरनेट नोड्सच्या उपकरणांचे WiFi द्वारे परीक्षण केलं जाईल. याशिवाय, १,५०० एअरगॅप्ड नोड्स आणि २,००० उपकरणांचे नेटवर्क त्यांच्या कामाचं निरीक्षण करण्यास सक्षम असेल.

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र असं असतानाही डेटा ब्रीचच्या घटना घडत आहेत. भाजपची वेबसाईट हॅक झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची वेबसाईटही हॅक करण्यात आली होती. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) देखील सायबर हल्ल्यातून सुटू शकलं नाही. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संगणकांवरही सायबर हल्ला झाला आहे.

New Parliament of India
New Parliament of India

संसदेच्या नवीन इमारतीत थर्मल इमेजिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. याद्वारे संसद भवन संकुलात कोणत्याही प्रकारची घुसखोरी सहज लक्षात येऊ शकते. यासोबतच संसद भवन संकुलावर नजर ठेवण्यासाठी चेहरा ओळखण्याची यंत्रणा सज्ज असलेले प्रगत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे ३६० अंश फिरतील आणि लक्ष ठेवतील.

संसद आणि इमारतीच्या आत उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांना सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे देण्यात आली आहेत.

नवीन संसद भवनात सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र सुरक्षा कार्य केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यापैकी एक इंटरनेट-इंटिग्रेटेड नेटवर्कसाठी असेल आणि बाकीच्या नेटवर्कमधून एअरगॅप केलेले नेटवर्क असेल.

सुरक्षा ऑपरेशन केंद्राचा उद्देश सायबर धोक्यांपासून संरक्षण करणे हा आहे. SOC चे विश्लेषक त्याच्या नेटवर्कचे चोवीस तास निरीक्षण करतील आणि कोणत्याही संभाव्य सुरक्षा घटनांची तपासणी करतील.

संसद भवन परिसरात कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला रोखण्यासाठी नवीन आय-कार्डपासून अनेक स्तरावरील सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यामध्ये अडथळे, कुंपण आणि चौक्यांवर आधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणे असलेले सुरक्षा दल तैनात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com