नागरिकत्व कायदा रद्द करणार नाहीच - अमित शहा

पीटीआय
बुधवार, 22 जानेवारी 2020

अमित शहा उवाच... 
- ममता बॅनर्जी बंगालमधील दलितांना नागरिकत्व नाकारत आहेत 
- नागरिकत्व काढून घेण्याचा मुद्दा कायद्यात नाहीच. 
- विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. 
- अयोध्येतील राममंदिराचे काम तीन महिन्यांत सुरू होईल.

लखनौ - सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) विरोधक जनतेची दिशाभूल करत असून, त्यांनी कितीही विरोध केला तरी हा कायदा रद्द करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज घेतली. तसेच, विरोधकांनी नागरिकत्व कायद्यावरून आपल्याशी खुली चर्चा करावी, असे आवाहनही शहा यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. ""नव्या कायद्यामध्ये कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. मात्र, तरीही कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बसप आणि तृणमूल कॉंग्रेस हे जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या विरोधकांनी कितीही आंदोलने केली तरी नागरिकत्व कायदा रद्द केला जाणार नाही,'' असे शहा यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व कायद्यावर खुली चर्चा करण्याचे आवाहनही अमित शहा यांनी विरोधकांना दिले. या वेळी अमित शहा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, "सप'चे अध्यक्ष अखिलेश यादव, बसप नेत्या मायावती आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची नावे घेऊन यांना थेट चर्चेचे आवाहन दिले. कॉंग्रेस मतांच्या राजकारणामुळे आंधळेपणाने वागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

झेन व आकाश यांना ‘बाल शौर्य पुरस्कार’

कॉंग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका करताना अमित शहा म्हणाले की, कॉंग्रेसच्या नेत्यांनीच पूर्वी पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्याची गरज व्यक्त केली होती. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि इंदिरा गांधी हे पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या बाजूने होते, मात्र कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या शिफारसींची कधीही अंमलबजावणी केली नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असताना विरोधक गप्प का होते? तसेच, पाच लाख काश्‍मिरी पंडितांना काश्‍मीरमधून निर्वासित व्हावे लागले, त्या वेळी एकाही विरोधी पक्षाने आवाज उठविला नाही. आता मोदींमुळे या लोकांच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट उगवली आहे. 

मित्रदेशांबरोबरील वाहतूक अधिक सोईस्कर करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न

राहुलबाबा, तुमचे डोळे उघडा. कॉंग्रेसच्या चुकीमुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली. त्यामुळे अल्पसंख्य झालेल्यांवर प्रचंड अत्याचार झाले. तेच लोक निर्वासित म्हणून भारतात आले. या लोकांचे हाल तुमच्या डोळ्यांना दिसत नाहीत का? 
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The citizenship law will not be cancelled amit shah