ग्रेटा टूलकिट प्रकरणात पहिली अटक; 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला घेतलं ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

भारताच्या बदनामीचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा संशय येऊन  ग्रेटाने शेअर केलेल्या प्रोटेस्ट टूलकिटची तपासणी सध्या करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशात सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीतही आपल्या निर्धारांसह मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला जागतिक पातळीवरुन देखील पांठिब्याचे आवाज उमटले. पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या ट्विटनंतर भारतात उलटसुलट चर्चा झाली. भारताच्या बदनामीचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा संशय येऊन  ग्रेटाने शेअर केलेल्या प्रोटेस्ट टूलकिटची तपासणी सध्या करण्यात येत आहे. सध्या याच प्रकरणामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बंगलुरुमधील 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला काल शनिवारी अटक करण्यात आली असून ही या प्रकरणातील पहिलीच अटक आहे. 

हेही वाचा - 'जीर्ण झालेल्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नाही; मी न्यायालयात जाणार नाही'

ग्रेटाच्या 'फ्रायडे फॉर फ्यूचर' आंदोलनाला भारतात सुरु करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक दिशा आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने टूलकिट प्रकरणात 4 फेब्रुवारी रोजी देशाच्या विरोधात कट रचणे, हिंसा भडकवणे आणि द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला होता. याच संदर्भातील पुढील तपासाबाबत दिशाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण कार्यकर्ती दिशाने माउंट कॅर्मेल कॉलेजमधून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. दिशा सध्या गुड माइल्क कंपनीसोबत काम करते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जेंव्हा तिला अटक केली तेंव्हा ती घरातूनच काम करत होती. तिच्यावरील आरोप असा आहे की, दिशा रवीने शेतकऱ्यांशी निगडीत टूलकिटला एडिट केलं. त्यात काही गोष्टी अधिक केल्या आणि मग त्या पुढे पाठवल्या. दिशा रविचे वडील म्हैसुरमध्ये ऍथलेटीक्स कोच आहेत. 

हेही वाचा - Uttarakhand : एका आठवड्यानंतर तपोवन बोगद्यात सापडले दोन मृतदेह; 33 जणांचा शोध जारी

ग्रेटा थनबर्गने या प्रकरणाबाबत त्याचवेळी ट्विट करत म्हटलंय की कुणीही मला घाबरवू शकत नाही. मी आतादेखील शेतकऱ्यांसोबतच उभी आहे. तसेच शांततेने आंदोलन करण्याच्या त्यांच्या हक्काचं समर्थन करते. द्वेष, धमकी अथवा मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या कसल्याही प्रयत्नांनी माझा निश्चय ढळणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate activist detained from Bengaluru in Greta Thunberg toolkit case