भाऊ मुख्यमंत्री आणि बहिणीने स्थापन केला नवा पक्ष; सोशल मीडियावरून टीका

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

बहिणीला दूर ठेवल्याने कुटुंबात धुसफूस सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला या गेल्या काही महिन्यांपासून वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या.

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे (संयुक्त) दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि सध्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी तेलंगणमध्ये स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करीत तेलंगणमध्ये ‘राजन्ना राज्यम’ आणण्याची ग्वाही दिली. तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत.

आई विजयलक्ष्मी यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी शर्मिला यांनी वडिलांच्या समर्थकांची बैठक मंगळवारी घेतली. या बैठकीला त्यांनी ‘आत्मीय संमेलन’ असे नाव दिले होते. वडिलांच्या निधनानंतर राजकारणात निर्माण झालेल्या पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. वायएसआर आणि विजयम्मा यांच्या लग्नाचा आज ५० वा वाढदिवस असल्याने राजकीय प्रवेशासाठी हा मुहूर्त त्यांनी काढल्याची चर्चा होती. याच बैठकीत शर्मिला यांनी तेलंगणमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

हे वाचा - Blog : मोदीजी, 'आंदोलनां'च्या तालावरच भक्कम लोकशाहीचं बिगुल वाजत असतं!

जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मतभेद असल्याचे सांगण्यात येते. वायएसआर काँग्रेस पक्षात कोणतेही महत्त्व न देता जगममोहन रेड्डी यांनी बहिणीला दूर ठेवल्याने कुटुंबात धुसफूस सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला या गेल्या काही महिन्यांपासून वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. काँग्रेस पक्षाशी संबंधित वायएसआर यांचे समर्थकही त्यांच्या संपर्कात आहेत. वायएसआर यांनी त्यांचे क्षेत्र आंध्र प्रदेशपुरते मर्यादित केल्यानंतर तेलंगणचे अनेक नेते राजकारणातून बाजूला पडले. तेलंगणमधील सर्व जिल्ह्यांतील अशा नेत्यांशी शर्मिला संवाद साधणार आहेत.

शर्मिला आज सकाळी बंगळूरहून येथे आगमन झाले. त्या आल्याचे समजतात त्यांचे चाहते आणि राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी ‘लोटस पाँड’ येथे गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तेथे उभारलेल्या फलकावर जगनमोहन रेड्डी यांचे छायाचित्र नव्हते. दरम्यान, शर्मिला या पक्षशिस्तीचे उल्लंघन करीत आहे, अशी टीका वायएसआर काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्या सज्जला यांनी केली.

हे वाचा - भारतात महिन्याभरापासून महिला तुरुंगात; आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुटकेची मागणी

‘आंध्रात पक्ष स्थापन करावा’
वाय. एस. शर्मिला यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याने तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)च्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून टीका केली. तेलंगण सरकारचे डिजिटल मीडिया संचालक कोंथम दिलीप म्हणाले की, जर शर्मिला यांचे भाऊ जगनमोहन रेड्डी यांच्याशी मतभेद असतील तर त्यांनी तेलंगणमध्ये नाही तर आंध्र प्रदेशात पक्ष स्थापन केला पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Jagan Reddy s sister Sharmila launch new regional party