

CNG vs EV, TERI Report
esakal
नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवंलबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, द एनर्जी ॲंड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)च्या नव्या अभ्यासात बहुतांश वाहनांच्या श्रेणीत सीएनजी वाहनांचा एकूण पर्यावरणीय भार हा इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.
देशाचे वीजनिर्मितीतील कोळशावरील मोठ्या प्रमाणात असलेले अवलंबित्व यामागील प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद केले आहे. विविध प्रोत्साहने, चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा व देशांतर्गत उत्पादनाला मदत देश ईव्हींचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे, व्यापक ऊर्जा सुरक्षा आव्हाने व आयात केलेली ऊर्जा व महत्त्वाच्या खनिजांवरील अवंलबित्व यासारख्या समस्यांनाही देशाला तोंड द्यावे लागत आहे.
पीएम ई-ड्राइव्ह उपक्रमातून ई वाहनांना चालना दिली जात आहे. सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘टेरी’ ने हा अभ्यास केला आहे. ‘भारताच्या ऊर्जा परिवर्तनातील वाहन-इंधनांच्या तुलनात्मक मूल्यांकनाबाबतचा अभ्यास’ या शीर्षकाच्या या अहवालात विविध वाहनांच्या तंत्रज्ञानाच्या पर्यावरणीय कामगिरीचे मूल्यमापन केवळ वाहन चालवताना होणाऱ्या उत्सर्जनाच्या आधारे न करता, त्यांच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करून करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. विश्लेषणात विचारात घेतलेल्या अनेक जीवनचक्र (एलसीए) मूल्यांकनाच्या निकषांत सीएनजीच्या वाहनांची चांगली कामगिरी केली.
एलसीए मूल्यांकन करताना इंधन किंवा विजेचे उत्पादन, वाहन निर्मिती, वाहनाचा वापर आणि वापरानंतरची विल्हेवाट यांसह संपूर्ण मूल्यसाखळीतील पर्यावरणीय परिणामांचा विचार केला जातो. ‘टेरी’ने हवामान बदल, कणांचे प्रदूषण, पाण्याचा वापर, जीवाश्म संसाधनांचा वापर तसेच खनिजे आणि धातूंचा वापर अशा निकषांचे मूल्यमापन केले. ईव्ही वाहनांतून कसलेही उत्सर्जन होत नसल्याने हवा प्रदूषण न करण्यात ही वाहने अग्रभागी आहेत.
मात्र, त्यांच्या एकूण जीवनचक्रात चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा स्रोत तसेच बॅटरीच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम याचाही मोठा प्रभाव पडतो. सर्वच वाहनांच्या श्रेणीत ईव्ही वाहनांची कामगिरी खराब नाही. मात्र, ‘टेरी’च्या निष्कर्षानुसार ईव्ही दुचाकी व तीनचाकीच्या वापराचा खर्च सर्वांत कमी आहे. चार्जिंगच्या पायाभूत गरजा, बॅटरीशी संबंधित पर्यावरणीय प्रभाव आणि महत्त्वाच्या घटकांसाठी आयातीवरील अवंलबित्व यामुळे मोठ्या ईव्ही वाहनांपुढे अधिक आव्हाने आहेत.
पाच श्रेणींतील वाहनांचे मूल्यांकन पेट्रोल, डिझेल, सीएनजी, विजेवर चालणारी व एलएनजी या सहा श्रेणींतील वाहनांचे मूल्यांकन करण्यात आले. तांत्रिक, पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक व भूराजकीय मुद्यांवर वाहनांची कामगिरी तपासण्यात आली. यापैकी एकाही श्रेणीतील वाहने प्रत्येक क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करू शकत नाहीत, याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.