काश्‍मीर खोऱ्यात थंडीची लाट

पीटीआय
सोमवार, 30 डिसेंबर 2019

जम्मू-काश्‍मीरसह उत्तर भारतात तापमानात घसरण सुरूच आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध दल लेक सरोवरही गोठले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार येथे नागरिकांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे. काश्‍मीर खोरे आणि लडाख केंद्रशासित प्रदेशात नीचांकी तापमान असून, सध्या सर्वत्र थंडीची लाट असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरसह उत्तर भारतात तापमानात घसरण सुरूच आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध दल लेक सरोवरही गोठले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार येथे नागरिकांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे. काश्‍मीर खोरे आणि लडाख केंद्रशासित प्रदेशात नीचांकी तापमान असून, सध्या सर्वत्र थंडीची लाट असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीनगरमध्ये काल रात्री उणे ६.२ अंश सेल्सिअस तापमान होते. शुक्रवारी रात्री तापमान उणे ५.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले होते. प्रसिद्ध दल सरोवरही गोठले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोतच गोठल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या गुलमर्ग येथे तापमान उणे ६.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर पहेलगाम येथे उणे १०.४ अंश तापमानाची नोंद झाली. लडाखमध्येही नीचांकी तापमान असल्याने कडाक्‍याची थंडी जाणवत आहे. लडाख येथे उणे १९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान असून, द्रास शहरात उणे २८.७ अंश सेल्सिअस तापमान आहे. ३१ डिसेंबरनंतर काही दिवस काश्‍मीर खोऱ्यात हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.  

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

हरियाना, पंजाबामध्ये थंडीची लाट
चंदीगड - हरियाना आणि पंजाबमध्ये थंडीची लाट असून, हिस्सार येथे ०.२ तर भटिंडा येथे ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियानातील हिसार आणि पंजाबमधील भटिंडा ही सर्वाधिक थंडीची ठिकाणे ठरली. चंदीगड येथेही २.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय हरियानातील नारनौल, सिरसा आणि रोहतक येथे अनुक्रमे १.५, १.८ आणि १.६ अंश सेल्सिअस अनुक्रमे तापमानाची नोंद झाली. पंजाब आणि हरियानात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज असल्याने नागरिकांना नववर्षाचे स्वागत कुडकुडतच करावे लागणार असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा - मायवतींच्या एका निर्णयाने काँग्रेसची पंचाईत; सरकार धोक्यात 

शाळा बंद राहणार
थंडीची लाट असल्याने हरियानातील शाळा ३० आणि ३१ डिसेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळांना दोन दिवस सुटी राहील, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२० पर्यंत सर्व शाळांना हिवाळी सुटी असणार  आहे. हरियाना आणि पंजाबमध्ये सध्या नीचांकी तापमानाची नोंद होत असून, रात्रीच्या वेळी तापमानात आणखीनच घसरण होत आहे. 

उत्तर प्रदेशात थंडीची लाट
लखनौ : उत्तर प्रदेशातही आगामी दोन-तीन दिवस वातावरणात गारवा राहील, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. सकाळच्या वेळी धुके पडत असल्याने दृश्‍यमानता कमी होत असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold wave in Kashmir Valley