वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवरुन भाजप-काँग्रेस समोरासमोर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

अमेरिकेतील वर्तमानपत्र वॉल स्ट्रिट जर्नलने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये फेसबुक आणि भाजपची भारतात युती असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेतील वर्तमानपत्र वॉल स्ट्रिट जर्नलने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये फेसबुक आणि भाजपची भारतात युती असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (BJP) आणि भाजपमध्ये जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी  वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. भारतात फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) भाजपचे नियंत्रण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी कोरोना विषाणू, चिनी घुसखोरी आणि बेरोजगारी अशा मुद्द्यांवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

भारतात फेसबुकची भाजपशी अघोषित 'युती'; अमेरिकेतील वर्तमानपत्राचा...
 

राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. भारतात फेबसुक आणि  व्हॉट्सअॅपवर भाजप आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. ते याद्वारे फेक न्यूज आणि द्वेष पसरवतात. निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी ते याचा वापर करत आले आहेत. अखेर, अमेरिकी माध्यमात फेसबुकबाबत खरे सत्य बाहेर आले, असं राहुल म्हणाले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये  वॉल स्ट्रिट जर्नलचे काही पाने शेअर केली आहेत. 

 

फेसबुक भाजपच्या  पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रिट जर्नलने दिला आहे. सत्ताधारी भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर फेसबुकने काहीही कारवाई केली नाही. भाजप नेत्यांवर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर प्रभाव पडेल, असं एका फेसबुकच्या अधिकाऱ्यांना म्हटलं असल्याचा हवाला वॉल स्ट्रिट जर्नलने  दिला आहे. भाजपचे नेते टी राजा सिंग (T Raja Singh) यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन अनेक आक्षेपार्ह वक्तव्य आणि व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, त्यावर फेसबुकने कारवाई केली नाही, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

फेसबुक पडलं तोंडावर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या
 

राहुल गांधी यांच्या ट्विटवर केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तात्काळ पलटवार केला आहे. स्वत:च्या पक्षातील नेत्यांवर प्रभाव टाकू न शकणारे हारलेले लोक एका रिपोर्टचा हवाला देत सर्व जग भाजप आणि आरएसएसद्वारा नियंत्रित होत असल्याचं म्हणत आहेत. निवडणुकीच्या आधी डेटाचा वापर करणाऱ्या कँब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकसोबत साटेलोटे करत असताना तुम्हाला रंगेहात पडकडण्यात आलं होतं आणि आता आम्हाला प्रश्न विचारत आहात, असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and BJP battle over Wall Street Journal report