देविंदरसिंगवरून काँग्रेस-भाजप भिडले

Congress-BJP
Congress-BJP

नवी दिल्ली - पोलिस उपअधीक्षक देविंदरसिंगला दहशतवाद्यांसमवेत पकडल्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकारण तापले. देविंदरसिंगचे संबंध कोणाशी जोडले गेले आहेत, हे पंतप्रधानांनी चौकशी करून सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली; तर काँग्रेसचे पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

जम्मू-काश्‍मीरचा पोलिस उपअधीक्षक देविंदरसिंग याला दहशतवाद्यांसमवेत पकडण्यात आल्यानंतर राजकारण तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेसने संशय व्यक्त करताना देविंदरसिंगचे संबंध नेमके कोणाशी जोडले गेले आहेत, हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी चौकशी करून सांगावे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी देवेंद्रसिंगच्या अटकेवरून ‘पुलवामा हल्ल्यामागे नेमके कोण होते, याची आता नव्याने चौकशी व्हावी’, अशी मागणी केली. देविंदरसिंगचे नाव देविंदर खान असते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ट्रोल आर्मी’ने गरळ ओकली असती. धर्म, जात, वर्ण विसरून देशाच्या शत्रूचा निषेध व्हायला हवा, असे म्हणताना अधीर रंजन चौधरी यांनी सुरक्षा दलांमधील उघड झालेली फितुरी चिंताजनक असल्याकडेही लक्ष वेधले. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, एकीकडे देविंदरसिंगला उत्कृष्ट कामगिरीचे पोलिस पदक दिले जाते. जगभरातील राजदूत काश्‍मीरच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी त्याच्याकडे जबाबदारी दिली जाते आणि तोच तीन दहशतवाद्यांना दिल्लीत घेऊन येतो. २६ जानेवारीला हल्ला घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आता सांगितले जात आहे की, केवळ १२ लाख रुपयांच्या बदल्यात त्याने दहशतवाद्यांसाठी कुरिअर सेवा दिली. हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद आहे.

सुरजेवालांचे प्रश्‍न
    देविंदरसिंग कोणाच्या सांगण्यावरून दहशतवाद्यांना दिल्लीत आणत होता
    सत्तेतील कोण उच्चपदस्थ यात गुंतला आहे
    हिज्बुल आणि इतर दहशतवादी संघटनांशी त्याचा काय संबंध आहे
    संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याशी त्याचा संबंध आहे काय
    पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हाच देविंदरसिंग पुलवामामध्ये उपअधीक्षक होता. 
    या हल्ल्यात आरडीएक्‍स कुठून आले; सुरक्षा दलांच्या वाहनताफ्यात बाहेरची गाडी कशी आली.

काँग्रेसचे पाकिस्तानशी लागेबांधे
जम्मू-काश्‍मीरचा पोलिस अधिकारी देविंदरसिंग याच्या धर्माचा काँग्रेसने उल्लेख केल्याने भडकलेल्या भाजपने, ‘‘काँग्रेसचे नेते पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत व त्यांची आजची वक्तव्ये ही उद्या इम्रान खानसाठी आंतरराष्ट्रीय मंचावर भारतविरोधी हत्यार बनतात,’’ असा प्रतिहल्ला चढविला आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष म्हणविणाऱ्या काँग्रेसचे पाकिस्तानशी जरूर काही ना काही लागेबांधे आहेत, असा आरोप भाजपने केला.

जम्मू-काश्‍मीरचे पोलिस अधिकारी देविंदरसिंग याचे नाव देवेंद्र खान असते, तर संघाच्या तुकडीने आकांडतांडव केले असते, असे ट्‌विट काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षनेते राहुल गांधी यांनी, हाच विचार पक्षाचा विचार आहे काय, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी विचारले की, राहुल गांधी यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल  काही संशय आहे काय? दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला अटक केली, तरी काँग्रेस नेते त्याचा धर्म शोधायला निघतात. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद यांसारखे शब्द काँग्रेसनेच शोधून काढले आहेत. हे सारे खेळ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर होतात. जी भाषा काँग्रेस बोलते, तीच भाषा पाकिस्तान बोलतो, यात काहीतरी गडबड आहे. दोघांमध्ये काहीतरी संबंध जरूर आहे. हाफीज सईद याच्या ‘आय लव्ह यू काँग्रेस’ या विधानाची पुनरावृत्ती होईल, असेही भाकीत पात्रा यांनी वर्तविले.

धार्मिक राजकारण ही जुनी पद्धत
दहशतवादावरही धार्मिक राजकारण करणे, ही काँग्रेसची जुनी पद्धत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर सोनिया यांनी दिग्विजयसिंह यांना सांगितले होते की, तुम्ही असा आरोप करा, की मुंबई हल्ला संघानेच घडवून आणला. हे खरे नाही काय?, असा सवालही केला आहे. बाटला हाउस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे पाहून सोनिया यांना तीन रात्री झोप लागली नव्हती, असे काँग्रेसचे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. पुलवामा हल्ल्याबाबत आता रणदीप सुरजेवाला पुन्हा संशय व्यक्त करीत आहेत, असा आरोप भाजपने केला.

भाजपचे गंभीर आरोप
 काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना हटविण्यासाठी आम्हाला मदत करता, असे सांगतात, याच्याशी काँग्रेस नेतृत्व सहमत आहे काय? हे देशाला समजलेच पाहिजे.
    राहुल गांधी यांनी  आम्हाला इस्लामी किंवा सिमी दहशतवाद्यांपासून नव्हे, तर हिंदूंपासून धोका आहे. भारताला हिंदूंपासून धोका आहे, असे म्हटले होते.
    सर्जिकल स्ट्राइकवरही जवानांच्या शौर्यावर अविश्‍वास दाखवून काँग्रेस नेते पुरावे मागतात.
    अधीररंजन चौधरी यांनी लष्करप्रमुख नरवणे यांची नुकतीच थट्टा उडविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com