LPG सिलिंडर डिलिवरीच्या नियमात 1 नोव्हेंबरपासून महत्त्वपूर्ण बदल

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन मोबाइल क्रमांक आणि पत्ता बरोबर आहे की नाही याची शहानिशा केली पाहिजे.

नवी दिल्ली: देशातील एलपीजी सिलिंडरच्या संदर्भात एक नवीन नियम येणार आहे. हा नियम 1 नोव्हेंबरपासून देशभरात लागू होण्याची शक्यता आहे. इथून पुढे एलपीजी सिलिंडर ओटीपीशिवाय मिळणार नाहीत. सिलिंडरची होम डिलिव्हरी पध्दतीतही मोठा बदल होणार आहे. होम डिलिव्हरीची प्रक्रिया एकसारखी असणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी तेल कंपन्यांनी नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे. नवीन प्रणालीला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) असे नाव देण्यात आले आहे. 

सिलिंडरमधून होणाऱ्या गॅस चोरीवर आळा आणण्याचे उद्दिष्ट-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याचा उद्देश एलपीजी सिलिंडरमधून गॅस चोरी रोखणे हा आहे. तसेच गॅस सिलिंडरची फसवणूक थांबवण्यासाठी नवीन नियम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवी प्रणाली सर्वप्रथम 100 स्मार्ट शहरांमध्ये राबवली जाणार आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये गॅसचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. घरगुती गॅसबद्दलच्या नवीन नियमांबद्दलची प्रायोगिक चाचणी सध्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सुरू आहे.

पुण्यातून कोरोना काढतोय पळ; दिल्ली, बेंगळुरूत पसरतोय पाय! 

होम डिलिव्हरीच्या पध्दतीतही होणार बदल-
तेल कंपन्या नवीन प्रणालीला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडशी जोडतील. ज्यामध्ये गॅसची बुकिंगनंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. या प्रणालीअंतर्गत डिलिव्हरी बॉयला कोड दाखवल्याशिवाय ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही. यामुळे आता गॅस प्रणालीतील बदलानंतर फक्त बुकिंग चालणार नाही तर ग्राहकांना नोंदनीकृत फोन नंबरवर आलेला कोडही दाखवावा लागणार आहे. 

Corona Updates: दिलासादायक! जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी मृत्यू

मोबाइल क्रमांक नोंदवणे बंधनकारक-
ग्राहकाचा मोबाइल क्रमांक अद्ययावत न केल्यास डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल. डिलिव्हरीच्या वेळी तुम्ही त्या अॅपच्या मदतीने डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून तुमचा मोबाइल नंबर अपडेट करू शकाल. मोबाइल क्रमांक अद्ययावत झाल्यानंतर कोड तयार केला जाईल. हे तुम्हाला त्याचवेळी करावे लागणार आहे जेव्हा तुमचा मोबाइल क्रमांक गॅस विक्रेता एजन्सीकडे नोंदणीकृत नसेल किंवा तुम्ही तुमचा नंबर बदलला असेल. त्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन मोबाइल क्रमांक आणि पत्ता बरोबर आहे की नाही याची शहानिशा केली पाहिजे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important changes rules LPG cylinders from upcoming 1 November