‘पंतप्रधान मोदींची उद्योगपतींशी भागीदारी’

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने तमिळनाडूमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले.

कोइमतूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बड्या उद्योगपतींशी भागीदारी असून जे काही जनतेच्या मालकीचे आहे त्याची विक्री करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. मोदींनी सत्तेत आल्यानंतर काय केले? देशातील तीन चार बडे उद्योगपती हाताशी धरले, या उद्योगपतींनी मोदींना माध्यमे दिली त्याबदल्यात मोदींनी त्यांना रग्गड पैसा दिला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथे जाहीरसभेत बोलताना केला. 

शिखर धवनला भूतदया पडू शकते महागात; फोटो शेअर केल्यानं अडचणीत

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने तमिळनाडूमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल यांनी पहिल्यांदाच झंझावाती प्रचारसभा घेत केंद्राला धारेवर धरले. यंदा एप्रिलच्या शेवटी तमिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

देशाच्या आणि तमिळनाडूच्या मालकीची प्रत्येक गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी विकत आहेत. जे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे, ते नव्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून हिरावून घेतले जात आहे. आताही देशातील कामगार आणि शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींचा नोकर बनविण्याचे कारस्थान आखले जात आहे, अशी टीका राहुल यांनी केली. आमच्या पक्षाचा एका विचारधारेशी संघर्ष सुरू आहे. ज्यांना देशावर एक संस्कृती, भाषा आणि संकल्पना लादायची आहे, अशांसोबत आमचे भांडण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान सापडला 'रंगेहात'; काश्मिरमध्ये भुयारामार्गे दहशतवादी करायचे...

तमीळ अस्मितेला स्पर्श

तमीळ अस्मितेला स्पर्श करताना राहुल म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींना तमिळनाडूमधील संस्कृतीबाबत कसलाही आदर नाही. या राज्यातील जनता, भाषा आणि संस्कृती हे आपल्याच सांस्कृतिक संकल्पनेचे नोकर असावेत असे त्यांना वाटते.’’  राहुल गांधी हे राज्याचा पश्‍चिम भाग पिंजून काढणार असून इरोडमध्येही ते जाहीरसभा घेणार आहेत. याआधीही त्यांनी राज्याचा दौरा करत जल्लिकट्टू स्पर्धांचा आनंद लुटला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader rahul gandhi criticize pm narendra modi