शिखर धवनला भूतदया पडू शकते महागात; फोटो शेअर केल्यानं अडचणीत

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

वाराणसीत शिखर धवनने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले होते तसंच गंगा आरतीही केली. यावेळी त्यानं ओळख लपवण्यासाठी मास्क घातला होता.

वाराणसी - भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वाराणसीत नावेतून फिरताना त्यानं परदेसी पक्ष्यांना दाणे खायला टाकले होते. सध्या बर्ड फ्लूचं संकट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणं टाळावं असं प्रशासनाने बजावलं आहे. असं असताना धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यानं त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. शिखर धवनचे काही फोटो सोशल मीड़ियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे.

जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, शिखर धवन नौका विहारासाठी गेला होता त्या नाविकावरसुद्धा कारवाई सुरु केली जात आहे. त्यांनी सांगितलं की, बर्ड फ्लूचं संकट असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी आहे. मात्र शिखर धवनने त्यांच्या अधिकृत ट्विवटर अकाउंटवरून एक फोटो ट्विट केला होता. त्यात तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. या फोटोची आता चौकशी केली जात आहे.

वाराणसीत शिखर धवनने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले होते तसंच गंगा आरतीही केली. यावेळी त्यानं ओळख लपवण्यासाठी मास्क घातला होता. मात्र तरीही काही लोकांनी धवनला ओळखलं होतं. धवनने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय आणखी एक फोटो व्हायरल होत असून त्यात त्रिपुंड लावल्याचंही दिसतं.

हे वाचा - 'तुम्हाला हे शोभत नाही'; PM मोदींच्या व्यासपीठावर जय श्रीराम ऐकताच ममतादीदी भडकल्या

देशातील 12 राज्यांमध्ये कावळे, प्रवासी पक्षी, जंगली पक्षी यांच्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने म्हटलं होतं की, 23 जानेवारीपर्यंत नऊ राज्यात बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या राज्यांमधील संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले असून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री फार्मचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shikhar dhawan varanasi photo violetion fo bird flu guidline