esakal | राहुल गांधी बनले आचारी, चुलीवर बनवली मशरूम बिर्याणी; Video Viral
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul_Gandhi

रायता बनवताना कांदा आणि दही याला तमिळमध्ये वेंगायम आणि थाईर असं उच्चारताना राहुल दिसत आहेत. मला जेवण बनवायला आवडतं असंही यावेळी राहुल यांनी सांगितलं. 

राहुल गांधी बनले आचारी, चुलीवर बनवली मशरूम बिर्याणी; Video Viral

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांनी बिर्याणी बनवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. तमिळनाडूच्या एका गावात स्थानिकांसोबत मशरूम बिर्याणी बनवताना आणि त्या बिर्याणीचा गावकऱ्यांसोबत आस्वाद घेणारे राहुल गांधी या व्हिडिओत दिसत आहेत.  

तमिळनाडूतील लोकप्रिय कुकिंग शो 'व्हिलेज कुकिंग चॅनल' (Village Cooking Channel) यामध्ये राहुल शेफच्या भूमिकेत दिसून आले. व्हिलेज कुकुंग चॅनल या यू-ट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल सध्या तमिळनाडूच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत मशरुम बिर्याणी बनवण्याचा आनंद लुटला. 

'शेतकऱ्यांचा अपमान सहन होत नाही'; अनेक भाजप नेते राजीनाम्याच्या तयारीत!

देशातील अत्यंत महत्त्वाच्या पक्षाचा महत्त्वाचा भाग असलेल्या राहुल यांनी सामान्य माणसाप्रमाणे जमिनीवर भारतीय बैठक मारत जेवणाचा आनंद लुटला. तमिळ स्टाईलमध्ये केळीच्या पानांवर मशरूम बिर्याणी वाढण्यात आली. यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी पुदुच्चेरी आणि तमिळनाडूचे प्रभारी दिनेश गुड्डूराव त्यांच्यासोबत होते. बिर्याणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तमिळ भाषेतील नावं राहुल यांनी यावेळी उच्चारल्याचे ऐकायला मिळते. रायता बनवताना कांदा आणि दही याला तमिळमध्ये वेंगायम आणि थाईर असं उच्चारताना राहुल दिसत आहेत. मला जेवण बनवायला आवडतं असंही यावेळी राहुल यांनी सांगितलं. 

फोन पे चर्चा! सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी शेतकऱ्यांसदर्भात केली 'मन की बात'​

आमच्यासाठी हा मोठा दिवस आहे. राहुल गांधींनी आमची कुकिंग पाहिली आणि त्यांच्यामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालं आहे. परंपरागत रेसिपीसोबत आम्ही मशरुम बिर्याणी बनवली. आणि राहुल गांधी यांनी आमच्या सोबत बिर्याणी बनवण्याचा आणि खाण्याचाही आनंद लुटला. हे क्षण अविस्मरणीय आहेत. अशी संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद, राहुल गांधी सर, असं व्हिलेज कुकिंग चॅनेलने म्हटलं आहे. 

बिर्याणी बनवताना या टीमने राहुल गांधींशी संवाद साधला. परदेशात जाऊन कुकिंग करण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या देशात जायला आवडेल, असं राहुल गांधींनी विचारताच अमेरिका असं उत्तर आलं. तेव्हा यूएसमध्ये माझे सॅम पित्रोदा हे मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून मी तुमच्या यूएस ट्रीपबद्दल प्लॅन करण्यात मदत करेन, असं आश्वासनही राहुल यांनी यावेळी दिली. 

बाजार समितीतील सुधारणांबाबत शरद पवारांचं भाष्य, म्हणाले...​

रोम्बा नल्ला इरुक्कू
जेवणावेळी राहुल गांधींनी जेवण बनवणाऱ्याचंही कौतुक केलं. राहुल तमिळमध्ये म्हणाले की, रोम्बा नल्ला इरुक्कू म्हणजे हे जेवण खूप चांगलं झालं आहे. उत्तम तमिळ डिश, मी या अन्नाचा मनसोक्त आनंद घेतला.' तसेच कुकिंग टीम आणखी कोणत्या डिश बनवतात याची चौकशीही केली आणि निरोप घेण्यापूर्वी त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या. 

केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या राहुल गांधींच्या या साधेपणाबद्दल नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. जमिनीशी जोडला गेलेला नेता असंही त्यांनी म्हटलं आहे. काही तासातच मशरूम बिर्याणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)